'काटेसावर ’ (कथा) - भाग 2
मीटिंग रूम रिकामी झाली… पण मुग्धाच्या मनात मात्र विचारांचा कल्लोळ सुरू होता.
तिच्या विचारांना खंड पडला…
“मिस मुग्धा.”
थंड, धारदार, आदेश देणाऱ्या आवाजाकडे तिने दचकून बघितलं.
समोर मकरंद उभा होता. बाकी सगळे गेले होते.
’ फॉलो मी’ एवढंच म्हणाला. ती त्याच्या मागे त्याच्या केबिन मधे गेली.
मकरंदची कंपनी ग्लोबल इंटेलिजन्स सोल्युशन्स ही एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सी होती. अधिकृतपणे कॉर्पोरेट रिस्क मॅनेजमेंट, पण प्रत्यक्षात…
भारतीय इंटेलिजन्स ब्यूरोला सायबर, ह्युमन आणि टेरेन थ्रेट्समध्ये मदत करणारी गुप्त शाखा.
आणि ती “मोठी घटना”?
देशातल्या एका महत्त्वाच्या हॉस्पिटल चेन च्या पेशंट्सचा मेडिकल डेटा हॅक होणार होता आणि सोबतच बॉम्बस्फोट्स चा थ्रेट होता.
हल्लेखोरांचा लीडर भारतात पोहोचला होता. आठ दिवसा पूर्वीच ही बातमी आली होती. सगळ्या स्ट्रॅटेजीज वापरून सुद्धा अजूनही तो हाती लागला नव्हता.
“सायबर थ्रेट डिटेक्शन?”
मकरंदने तिच्या फाईलकडे न पाहताच विचारलं.
“हो सर.”
आवाज शांत, डोळे स्थिर.
“थिअरी सगळ्यांना येते,” तो थोडासा चिडून म्हणाला,
“इथे चूक झाली तर देश धोक्यात येतो.”
“मला माहिती आहे,” मुग्धा हळूच म्हणाली,
“म्हणूनच मी इथे आहे.”
त्या एका वाक्यावर तो भडकला.
“इथे आहेस म्हणजे पात्र आहेस असं होत नाही!”
ती काहीच बोलली नाही.
तिला दिसलं
त्याच्या कपाळावरची रेषा,
डोळ्यांतला झोप न झाल्यामुळे थकवा,
आणि आवाजात दडलेली असहायता.
‘काटे… पण संरक्षणासाठी’ … तिला वाटलं.
त्याने तिला सगळ्या इंस्ट्रक्शन्स दिल्या आणि जायला सांगितले.
सगळी टीम आपापल्या कामाला लागली होती. दहा जणांची सायबर क्राइम डिटेक्शनची टीम आणि मकरंद, इतकेच अॉफिस मधे होते. ती रात्र सगळ्यांसाठीच वैऱ्याची होती.
मुग्धाने काम सुरू केलं.
डेटा पॅटर्न्स, डार्क वेब फोरम्स, स्लीपर कोड्स…
ती हॅकर्सला कोडमधून शोधत होती.
आणि रात्री तीन वाजता…
“सर… सापडलाय.” त्याच्या केबिनच्या स्पीकर वर तिचा आवाज घुमला. तो ताबडतोब तिच्या जवळ आला. मकरंद पहिल्यांदाच तिच्याकडे आशेने पाहत होता.
सगळी टीम एकत्र आली… भराभर सूत्रं हलली. आय बी ऑफिसर्सला कळवल्या गेलं. हल्लेखोरांचा डाव मोडून पडला… देशाचं खूप मोठं नुकसान होण्यापासून वाचलं…
मकरंद आज थोडा समाधानी वाटत होता. आता पर्यंत मुग्धा त्याची विश्वासु एम्प्लॉई झाली होती.
त्या रात्री, ऑफिसच्या बाल्कनीत ती त्याच्या साठी कॉफी घेऊन आली.
“हा प्रोजेक्ट माझ्यासाठी वैयक्तिक होता”
तो पहिल्यांदाच हळू आवाजात बोलला.
“पाच वर्षांपूर्वी… अशाच एका हल्ल्यात मी माझा अख्खा परिवार गमावला.”
मुग्धा काहीच बोलली नाही.
ती फक्त ऐकत होती.
“तेव्हापासून माझं एकच ध्येय, एकच स्वप्न आहे… अश्या हल्ल्यांपासून लोकांचे परिवार वाचवणं…
ह्या ध्येयपूर्तीसाठी, मी भावनिक दृष्ट्या कुणाला जवळ येऊ देत नाही. "
’ तर काटेसावरीचं झाड अखेर बहरतं आहे’.. तिच्या मनात आलं.
काही न बोलता तिनी त्याच्या हातात कॉफीचा कप दिला… समोरच काटेसावरीचं झाड होतं… लाल चुटुक रंगाच्या फुलांनी बहरलेलं… दोघेही त्याच्या कडे बघत एक एक घोट कॉफी घेत होते. आतापर्यंत
मुग्धाच्या मनातलं त्याच्या साठीचं प्रेम त्याच्याही लक्षात आलं होतं.
“मुग्धा,”
तो थोडासा अडखळत म्हणाला,
“माझ्यावर प्रेम करणं सोपं नाही.”
ती हसली. काटेसावरी कडे बघत म्हणाली
“काट्यांची मला भीती वाटत नाही… त्यांच्या पलीकडे आत आत हृदयात जे प्रेम आहे ते मला जाणवतं” असं म्हणून त्याच्या कडे बघितलं.
तो तिच्यावर मुग्ध झालेला… तिच्या नजरेत आधार शोधत तिच्या जवळ आला.
“ मुग्धा जसा काटेसावर बहरतो…
तसं माझं आयुष्य तुझ्यामुळे फुललं,”
तो म्हणाला.
ती काहीच बोलली नाही.
फक्त त्याचा हात धरला.
काटेसावर आज पूर्णपणे बहरला होता!
सई देशपांडे
16.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
