‘काटेसावर’
ध्यानस्थ योगी!
चारी कडे बहर आलेला असताना
तू मात्र रुक्ष, निष्पर्ण…
कुणाला जवळ येण्याची भीती वाटेल…
इतका काटेरी!
पण मला भावतं!
तुझं हे तुटक,आत्ममग्न रूप…
मला भिती वाटत नाही…
तुझ्या एकाही काट्याची.
त्या काट्यांवरून हलकेच बोटं फिरवताना जाणवतं…
तुझ्या मनातलं सळसळतं प्रेम!
मी जाणून आहे…
तुझं रक्षा कवच!
अंगावर कितीही काटे सजवलेस,
तरी मला कळतात…
तुझ्या रंध्ररंध्रातल्या बहरून येण्याच्या,
अदम्य इच्छा…
जसं तुझं हृदय तसाच तुझा बहर!
जर्द, चकचकीत, लक्षवेधी…
सगळ्यात देखणी, सगळ्यात उंचावर…
अशी राजस्वाणी फुलं!
आणि फळं? ती तर तुझ्या हृदयाचंच रूप!
मऊ शार जाणिवांनी भरलेली!
ऐकतोयस न?
तुझ्या काट्यांवर प्रेम करत…
तुझ्या मनातिल जाणिवांना जाणवून घेत
वाट बघतेय…
तुझ्या बहरण्याची!
आजच त्याचं हे रूप बघून तिनी एकदा काटेसावरीच्या झाडावर लिहिलेली ही कविता मुग्धाला आठवली… मीटिंग मधे पंचवीस,तीस कर्मचाऱ्यांवर तो अक्षरशः फायरिंग करत होता. मीटिंग रूम मधे पिन ड्रॉप सायलेंस होता.सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं होतं. चूकच अशी झाली होती…
ह्या मुख्य टीमला अजूनही त्याने सांगितलेला व्यक्तीबद्दल काहीच माहिती सापडली नव्हती. 15 दिवसात जर त्याचा पत्ता नाही लागला तर खूप मोठी घटना घडणार होती. दिवस जस जसा जवळ येत होता तशी तशी त्याची काळजी वाढत होती. आता मात्र मकरंदने सगळ्यांना निर्वाणीचा इशारा दिला होता… “दोन दिवसाच्या आत मला त्या माणसा बद्दल माहिती दिली नाहीत तर मला तोंड दाखवू नका” म्हणून तो तिथून निघून गेला…
बाकी सगळ्यां सोबतच मुग्धाही उभी झाली. तिथे असलेल्या एकूणएक व्यक्तीला मकरंदचा धाक पण खूप होता पण मनात प्रचंड आदर होता. मुग्धा नवीनच ह्या टीम मधे जॉइन झाली होती. अजून तिला काय काम करायचंय हे निश्चित झालं नव्हतं. सध्या ट्रेनिंग सुरू होतं तिचं. बॉस बद्दल फक्त ऐकलं होतं.. अतिशय खूंखार माणुस आहे म्हणून… आज हा तिचा पहिलाच सामना होता त्याच्याशी. पण त्याची कंपनी ज्या कारणा साठी कार्य करत होती तो उद्देश फार पवित्र होता म्हणूनच त्याचं हृदय नक्कीच हळव्या भावनांनी ओतप्रोत असेल असं तिला वाटायचं.
मकरंद ने कुठल्या माणसाची माहिती काढायला सांगितली होती?
कुठली मोठी घटना घडणार होती?
मुग्धाला काय काम दिल्या गेलं?
मुख्य म्हणजे मकरंद, मुग्धाला वाटायचा तसा होता की रुक्षच होता?
जाणून घ्यायला पुढील भाग वाचायला विसरू नका.
सई देशपांडे
15.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
