गोड. नित्य हो बोला
…हेमंत नाईक
१४. ०१. २०१६
दरवर्षी १४ जानेवारीला नक्की येणारा संक्रातीचा दिवस उजाडला उत्तरायण सुरु झाले. सुरेख लेखाचा शब्दरूपी तिळगुळ वाटण मात्र आपलं १ तारखेलाच नववर्षदिनी सुरु झालं आहे..
तिळगुळ घ्या गोड गोड
सारे हो नित्य बोला
उंच नभात जमला
रंगीत पतंगाचा मेळा
वाणीचा तोल सांभाळा
गोड नित्य हो बोला..
जीवनी एकच फक्त्त
सदविचार करुनी
गैरसमजा घाला आळा
गोड नित्य हो बोला..
राग अवचित येता
मनात अंक मोजा
मती स्थिर ती ठेवा
गोड नित्य हो बोला..
शुभाशुभ नसते जगती
रंग सारे सारखे असती
पांढरा,काय तो काळा
गोड गोड हो बोला..
ऊर्जा देई काळे कपडे
नमन उत्तरायणी भास्करा
प्रिय आवडणारे सत्य
गोड नित्य हो बोला..
हळू हळू थंडी सरली
ऊर्जा देण्या परतला
गरम तीळाचा हलवा
गोड नित्य हो बोला..
या बोलीचे स्मरण देण्या
सण आला सक्रांतीचा
नाते प्रेमळ जपण्या
गोड नित्य हो बोला..
तिळगुळ घ्या गोड गोड
सारे हो नित्य बोला..
संक्रातीत तिळगुळ घ्या आणि गोड बोला असा संदेश देऊन आपण नेहमी गोड बोलण्याचा निश्चय करतो खरा, पण तो कितपत टिकतो हा एक प्रश्नच आहे..मात्र दरवर्षी नियमितपणे नेहमी गोड बोला याचे स्मरण देणारा आजचा हा दिवस!!
“ तिळगुळ द्या अथवा हत्तीवर बसून साखर वाटा माणूस तेव्हाच गोड बोलतो जेव्हा त्याची गरज असतें.”
अशी एक या युगातील वास्तव दर्शवणारी पोस्ट कालच माझ्या वाचण्यात आली.
त्यामुळे गोड बोलता येत असेल तर उगाचच कटू बोलून वाद ओढवून येणारी भविष्यात कायमची कटुता मात्र आपण नक्की टाळू शकतो.
संक्रातीस महिला वर्ग काळे कपडे परिधान करतात.. हळदीकुंकू आणि संक्रातीचे वाण देतात.आता ही प्रथा सुध्दा काळानुरूप कमी होते आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि सूर्याच्या या राशीपरिवर्तनाला मकर संक्रांती म्हटले जाते. सौर दिनदर्शिकेनुसार सूर्याच्या राशी परिवर्तानाच्या दिवसाला सोल्स्टिस म्हणजेच मकर संक्रांती असे म्हटले जाते. या दिवसाला उत्तरायण देखील म्हटले जाते. हा दिवस आणि रात्र हिवाळ्यातील सर्वात थंड आणि खूप मोठी असते. त्यामुळे या मोठ्या रात्रीच्या काळोखाला निरोप देण्यासाठी, आणि थंडीत ऊर्जा साठवण्यासाठीही या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घातले जातात अशी मान्यता आहे.
महाराष्ट्राच्या इतिहासात मात्र संक्रात सणाबरोबर पानिपताची अतीव दुःखद घटनाही जोडली गेली आहे…
“संक्रात आली”, (अरिष्ट आलं) या अर्थाचा हाही एक वाकप्रचार मराठीत आहे… काही जाणकारांच्या मते हा मराठ्यांच्या पानिपत येथे संक्रन्तीच्या सुमारास एक दिवसात झालेल्या अपरिमित हानी नंतर अस्तित्वात आला आहे. त्या हानीचे वर्णन इतिहासात लिहिताना,
“लाख बांगडी फुटली, दोन मोती गळाले, २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही…”
असे भीषण दाहकता दर्शविणारे वर्णन केले आहे.
सूर्य संक्रातीस उत्तरायणात जात असला तरी महाराष्ट्रात मात्र त्यावेळी घरोघरी दुःख होते..खुओ मोठा ऱ्हास तेव्हा रयत अनुभवत होती.
याच कारणाने संक्रातीस उदासीनतेची छाया पूर्वीच्या बऱ्याच पिढ्यानी अनुभवली..तेव्हा तिळगुळ ही गोड लागत नव्हता.
असो…कालाय तस्मै नमः
आतातर मोबाईल च्या युगात प्रत्येकजण व्हाट्सअँप वर बिझी आहे. घराघरात सोफ्यावर बसलेलं कुटुंब आणि आपापल्या मोबाईल वर चाललेले त्यांचे विविध चाळे/खेळ .. असेच काहीस चित्र आहे. त्यामुळे गोड बोलण तर सोडा…आता तर साधा संवादही कमी होत आहे.पूर्वीच्या गप्पा, हास्य कल्ल्लोळ, कमी झाल्या आहेत.
त्यामुळे अशा मोबाईल, टिव्ही आदी स्क्रीन प्रेमीसाठी या ओळी..नक्की उपयोगी पडतील.
बोल काहीतरी बोल
मोबाईल्स दूर ठेवुनी
चालू टीव्ही बंद करुनी
बोल मनातले बोल
शब्द आले नाही कानी
_आसूसले कान ऐकण्या_
प्रियजनांचे मधुर बोल
बोल काहीतरी बोल
बडबडीस का विसरता
नाही भांडण नाही तंटा
का होता उगा अबोल
बोल काहीतरी बोल
अशा सर्वं स्क्रीन प्रेमी अबोल मंडळींना
*तिळगुळ घ्या* पण
*काहीतरी बोला*
असे म्हणावसे वाटते
सर्व सुरपाखरांना अखंड गोड बोलण्याच्या आणि ऐकण्याच्या, सुखी आनंदी संक्रांतीच्या शुभेच्छा देऊन थांबतो.
…हेमंत नाईक
१४.०१.२६
#३०दिवसात ३०#प्रयोग २६