सूर्याच्या प्रवासातील आश्वासक वळण - मकर संक्रांती!

सूर्याच्या प्रवासातील आश्वासक वळण - मकर संक्रांती!

थंडीच्या कुशीत गुडूप झालेली पृथ्वी, सकाळच्या कोवळ्या उन्हाची वाट पाहत असते. आकाशात सूर्य जणू थांबून एक दीर्घ श्वास घेतो… आणि मग हळूच दिशा बदलतो. त्या क्षणाला नुसते आकाशच नाही, तर निसर्ग देखिल कुशी पालटतो… हाच तो क्षण… मकर संक्रांती! हा सण म्हणजे सूर्याने घेतलेल्या एका आश्वासक वळणाचा उत्सव!

खगोलशास्त्रा प्रमाणे सूर्य प्रत्यक्षात पृथ्वीभोवती फिरत नाही, तर पृथ्वी सूर्याभोवती परिभ्रमण करते. आपण पृथ्वी वर असल्यामुळे आपल्याला सूर्य आकाशात एका ठराविक मार्गाने फिरताना दिसतो.या मार्गाला क्रांतिवृत्त म्हणतात. या मार्गाला 12 भागांमधे विभागलं कि जे भाग तयार होतात ते भाग म्हणजेच 12 राशी. ह्या प्रवासात सूर्य बारा राशींमधून जातो. एका राशीतून दुसऱ्या राशीत जाणे म्हणजे संक्रांती. सूर्य जेव्हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो, त्या क्षणाला मकर संक्रांती घडते. हा क्षण साधारणपणे 14 किंवा 15 जानेवारीला येतो.

या दिवसाचे खरे वैशिष्ट्य म्हणजे उत्तरायणाची सुरुवात. पृथ्वीचा अक्ष सुमारे २३.५ अंशांनी झुकलेला असल्यामुळे सूर्यकिरण वर्षभर कधी दक्षिणी गोलार्द्धावर, तर कधी उत्तरी गोलार्द्धावर सरळ पडतात. मकर संक्रांतीपासून सूर्यकिरणांचा उत्तरी गोलार्धावर हळूहळू सरळ पडू लागतात. भारत उत्तरी गोलार्धात असल्याने ह्याचा परिणाम लगेच जाणवतो… दिवस हळूहळू मोठे होऊ लागतात, रात्री लहान होऊ लागतात आणि हवेतील गारवा कमी होऊ लागतो.

निसर्ग जणू दीर्घ निद्रेतून जागा होतो. झाडांवर कोवळी पालवी फुटते, शेतांमध्ये पिके बहरू लागतात आणि वातावरणात उबदार आशेची किरण पसरते. हा काळ शेतकऱ्यांसाठी विशेष महत्त्वाचा मानला जातो. संपूर्ण भारतात वेगवेगळ्या नावांनी - पंजाब हरियाणा मधे लोहरी, दक्षिणेत पोंगल, आसाम मधे माघ बिहू, गुजरात मधे उत्तरायण, हा उत्सव साजरा केला जातो.

हिवाळ्यात सूर्यप्रकाश कमी असल्याने शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम कमी झालेलं असतं. तिळगूळ एकत्र करून खाल्याने ही कमतरता दूर होते म्हणून आपल्या कडे तिळगुळाचे महत्त्व आहे. सूर्याचा उत्तरायणात प्रवास सुरू झाल्याने वारे वाहणं सुरू होतं आणि पतंग पण छान ऊंच झेपावतात म्हणून मकर संक्रांति पासून पतंगा उडवणं पण सुरू करतात.

प्राचीन भारतीय खगोलज्ञांनी आकाशाच्या हालचालींचा बारकाईने अभ्यास करून हा दिवस निश्चित केला होता.आकाशात शांतपणे घडणारी ही खगोलीय घटना पृथ्वीवरील जीवनाला नवचैतन्य देणारी आहे त्यामुळे मकर संक्रांती हा केवळ धार्मिक सण नाही, तर विज्ञान, निसर्ग आणि मानवी अनुभव यांचा सुंदर संगम आहे!

सगळ्यांना मकर संक्रांति च्या अनेक हार्दिक शुभेच्छा! तिळगूळ घ्या गोडगोड बोला!

सई देशपांडे
13.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026