प्रश्न आणि उत्तर..एक न संपणारी मालिका

प्रश्न आणि उत्तर..एक न संपणारी मालिका..

:writing_hand:हेमंत नाईक
१३. ०१. २०२६

“प्रश्नाकडे पाठ फिरवल्याने उत्तर शोधण्याची गरज संपते..”
हे विधान वरवर खरं वाटत असल तरी प्रश्न त्यामुळे संपत नाही पुढे भविष्यात तेच केव्हातरी आ वासून पुढे येतात आणि त्यांना त्यावेळी समोरे जाऊन उत्तर ही शोधावीच लागतात. प्रश्न अव्हॉइड करून चालत नाही.. फक्त्त पुढे ढकलता येतात आणि कधी कधी अशा वृत्तीमुळे काट्याचा नायटा होतो सहज सुटणारा प्रश्न भविष्यात गंभीर रूप घेतो.
आणि गंम्मत अशी आहे की काही वेळा शोधलेली उत्तरही नविन प्रश्न निर्माण करणारी असतात.

समोर असणाऱ्या प्रश्नाकडे बघायचा दृष्टिकोनही प्रत्येकाचा वेगवेगळा असतो,

“नो चिंता” म्हणून कसलीच चिंता न करणारे मजेत जगणारे बेफिकीर वीर
आणि
“चिंता करतो विश्वाची” म्हणून उगाच नसलेल्या समस्याची काळजी करत कायम दडपणाखाली असणारी चिंतातूर मंडळीही या जगात आहे.

थोडक्यात सांगायचे झाले तर,

प्रश्न उत्तराचा नित्य खेळ
त्यास म्हणतात जीवन
उत्तरातून जर प्रश्न निर्मिता
उत्तरासाठी परत वणवण

प्रश्न खूप कठीण पाहिले
अनुत्तरित जरी काही राहिले
सोडवण्याचा ध्यास ठेवता
जीवनाचे होते खरे सार्थक

प्रश्नोत्तराचा हा खेळ अद्भुत
कोणताही विषय नसे अपवाद
बिनधास्त शोधलेल उत्तर सांगा
व्यक्तता सजीवतेचे असते लक्षण..

वैयक्तिक बाबतीत बहुतेक सर्वजण आपल्या आलेल्या प्रश्नाच्या समाधानासाठी नक्की उत्तर शोधतो.. पण जेव्हा प्रश्न समाजाचा किंवा सर्वांचा असतो तर कोणीही त्याकडे लक्ष देत नाही… जणू काही त्याचे काही त्यांचेशी देणे घेणे नसतं. घरात पाणी येत नाही म्हणून तत्पतेने फोन करणारा रस्त्यावर वा सोसायटीत नळ फुटला हे सूचित करण्याची तसदी घेत नाही.

मला कोणताही फायदा नसताना मी का काम करू?
या विचारसरणीच्या मंडळीना, असे करणे म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजण्या सारखे वाटते.

अगदी परवाच इथं एक किस्सा बसमधून जाताना अनुभवला एक चायनीज मुलगा विस वर्षाचा असेल तो, एक वयस्कर इंग्लिश माणूस आणि मी असे फक्त्त तीन जण दूर दूर बसलो होतो..तो मुलगा चिंगम चघळत होता आणि शेवटी त्याने तो चिगमचा गोळा सीट खाली चिटकावण्याचा प्रयत्न करताना पाहून तो वयस्कर माणूस उठून त्याने त्याचे कान उघाडणी केली आणि तो चिंगमचा चोथा त्या मुलास खिशात ठेवायला लावला.

असे चित्र आपल्याकडे यायला अनेक वर्ष लागतील. नुसते चुकीला चूक म्हणून भागत नाही तर होणाऱ्या चुका थांबावण्याची जबाबदारी प्रत्येकाची असतें मग ती वैयक्तिक असो वा सामाजिक!.

महानगर पालिकेचे अगदी दोन दिवसावर इलेक्शन आहे मतदान राष्ट्रकार्य समजून सर्वांनी कराव या साठी जागृती अगदी ७५ वर्षांपासून होते पण मतदानाचा टक्का फक्त्त ६० टक्के..असणार..असो.

.. हेमंत नाईक
१३. ०१. २०२६
सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६