रांगोळी - क्षणभंगुर आयुष्याचं रंगीत तत्वज्ञान!

रांगोळी - क्षणभंगुर आयुष्याचं रंगीत तत्वज्ञान!

पहाटेच्या शांत क्षणी, अंगणावर टाकलेल्या सड्याची ओल आणि त्या ओलसर मातीवर रांगोळीच्या रंगीत रेषा अलगद पडतात तेव्हां एक सुंदर आकार जन्म घेतो. कुठलाही गाजावाजा नाही… कुठलीही अपेक्षा नाही!

बोटांच्या टोकातून झरणारे रंग जणू आयुष्यालाच आकार देत असतात… प्रत्येक वळण, प्रत्येक ठिपका मनाच्या खोल थरांतून उमटलेला असतो. रांगोळी काढताना कलाकार केवळ अंगण सजवत नाही, तो स्वतःशीच संवाद साधत असतो. ही प्रक्रिया ध्यान (मेडीटेशन) करण्या सारखी आहे.

ही रांगोळी सुंदर असते, मोहक असते, पण तिला टिकण्याचा हव्यास नसतो. सूर्य वर चढतो, तिच्यावर पावले पडतात, वारा वाहतो आणि हळूहळू ती पुसली जाते. कुणी हळहळत नाही, कुणी थांबवत नाही… कारण मिटणे हेच तिचे अंतिम सत्य असते. जसं माणसाचं आयुष्य… आज आहे, उद्या नाही!

मानवी आयुष्यही रांगोळीप्रमाणेच आहे. आपण यश, पैसा, नाती, प्रतिष्ठा या रंगांनी आयुष्य सजवतो. ही रंगं आपल्याला अतिप्रिय वाटतात,आपण त्यांचा अभिमान बाळगतो, पण काळाच्या ओघात काहीच कायम राहत नाही. सुख-दुःख, लाभ-हानी, जन्म-मृत्यू हे सर्व येतात आणि जातात. ‘हे माझेच आहे’ ही भावनाच दुःखाचे मूळ ठरते. रांगोळी मात्र नम्रपणे सांगते… काहीही कायमचे नाही.

ती हेच शिकवते की, सौंदर्याचा आस्वाद घ्या, पण त्यावर हक्क गाजवू नका.ती स्वीकाराची शिकवण देते…जे येते ते स्वीकारा, जे जाते त्याला शांतपणे जाऊ द्या. प्रत्येक क्षण सुंदरपणे जगा, चांगले कर्म करा आणि परिणामांशी अलिप्त राहा. हेच गीतेत कृष्ण पण शिकवतो.

रांगोळी ही कला, एक साधना आहे. ती सांगते, निर्माण करणे महत्त्वाचे आहे, जपून ठेवणे नव्हे… जीवनाच्या प्रत्येक सकाळी नवी रांगोळी काढावी लागते… असेच आयुष्याच्या प्रत्येक क्षणात, पूर्ण मनाने रंग भरावे लागतात, तरच ते खरे जगणे ठरते.

अशी ही साधी, पण गूढ अर्थ सांगणारी रांगोळी, जगाच्या नश्वरतेची आठवण करून देणारी, मनाला स्थैर्य देणारी भारतीय कला आहे.

फोटो संस्कारभारती च्या सहा हजार चौरस फूट रांगोळी उपक्रमाचा आहे. त्यात मधल्या गोलात कलांच्या वेग वेगळ्या विधा काढायच्या होत्या. त्यात ‘नृत्य’ ही विधा मी रेखाटली होती.बघायला येणाऱ्यांना खूप आवडली… जवळपास दीडशे कलाकारांनी मिळून ही काढलेली रांगोळी कमीत कमी 4,5 दिवस राहील अशी आशा होती पण दुसऱ्याच दिवशी धो धो पाऊस आला आणि सगळी रांगोळी वाहून गेली होती. अविस्मरणीय अनुभव होता तो. ती रांगोळी नश्वरतेची खूप मोठी शिकवण देऊन गेली.

सई देशपांडे

12.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026