मी कोण? हा प्रश्न दार्शनिक स्वरूपात मनात येण्याआधीच त्याची तार्किक स्वरूपात उकल व्हायला सुरुवात झालेली असते.
आरशात दिसतं ते बाळ नाही, श्री आहे हे आई, ताई सांगत राहिले असणार. महान श्री … आणि मग पुढे तो आरशातील ‘श्री’ ‘मी’ झाला. मी!!! खरं तर तो ‘आरशातील मी’ असतो, माझे समोरून बाहेरील रूप दाखवणारा. मग खरा ‘मी’ कुठे असतो? खरा ‘मी’ दाखवणारा आरसा मनात असतो हे अनेक वर्षांनी उमजलं ! पण तो तरी ’ खरा’ श्री असतो? नाहीच… मी कोण हे भल्या भल्याना उमगले नाही. कारण हिमनगासारखा असतो प्रत्येक मी. इतरांना दिसतं ते पाण्याबाहेरील हिमनगाचं टोक. माझं वर्तन! वर्तन घडवणारे विचार, त्यामागील भावना, मनातलं भय,शरम, राग, भूतकाळातील घटनांची स्मृती हे सारे लपलेले असतात पाण्याखाली.
स्वत:च्या दैहिक ओळखीने पुढे अनेक वळणं घेतली. आणि ती अर्थातच आसपासच्या लोकांनी दिलेल्या गुण-विशेषणांमुळे. हे जरा गोडच झालं. खरं तर संत बेंबट्या सांगून गेलेत, ‘असा मी असामी’ मध्ये तेच पुनरुक्त करून सांगतो. नाकाचं भज असणं, काडी पैलवान असणं, केसांच्या झिपऱ्या असणं. अशी माझी ओळख देखील बरेच ना-तेवाईक मलाच करून देत. स्वत:चे मनोरंजन करण्यासाठी लहान बाळाचं माकड करत असतात. हा अमानवीय खेळ अजूनही सर्रास सुरु असतो. समाजात वाढलेल्या हिंसेचे कारण हेच तर नसेल?
बेंबट्याचा धोंडू झाला तसा माझा शिऱ्याचा श्री झाला. देहाला स्मार्टनेस आणण्यात पेहराव हातभार लावतोच. वयाच्या १०-१२व्या वर्षांपर्यंत पेहरावावर स्वत:च असं नियंत्रण नव्हतं. वाढदिवसाला मिळणारा नवा शर्ट त्याला अपवाद. वाढदिवसाला घेतलेला एक लाल रंगाचा शर्ट अद्याप आठवतो, खूप आवडायचा. शेजारची बंगाली काकी खूप चिडवायची, “श्री ये शर्ट मेरे कालू को दे दे”. ती कधीतरी ते खरंच काढून घेणार अशी एक भीती मनात असायची.
घरात मी सर्वात धाकटा. पण मला परंपरेने आलेले कपडे कधी घातल्याचं स्मरत नाही. अपवाद असू शकतो. मात्र माझे आणि माझ्याहून मोठ्या मुकुंदाचे कपडे साधारण सारखेच असत, रंग वेगळा. मी सातवीत आणि मुकुंद आठवीत असताना दादांनी मुंबईहून आमच्यासाठी सारखे पूर्ण चेनचे टी शर्ट आणले होते, फक्त रंग वेगळे. ही मुंबै स्टाईल आम्ही शाळेत सुद्धा मिरवत असू .
ह्या पेहेरावाची एक आठवण मनात घर करून राहिलेली. कारण मान-अपमानाची तीव्र जाणीव करून देणारा तो अनुभव. आई कधी कधी क्लाथ मार्केट मधून तोलाने कटपीस आणायची. काटकसरीने संसार करायच्या पद्धतीतली एक पद्धत. एकदा तिने एक पिज कलर आणि एक डार्क ब्राउन रंगाचे असे दोन तुकडे घेतले आणि माझ्या साठी त्याचा एक टी शर्ट शिवून घेतला. ती आमच्या एका आजोबांचे टेलरिंग शॉप होते तिथे तिच्या मनात असलेले डिझाईन सांगून शिवायला देई. ब्राऊन रंगाची कॉलर, बटन पट्टी असलेला तो ड्रेस. मी मोठ्या हौसेने तो नवा शर्ट घालून शाळेत गेलेला. मला वाटतं तो पीटीचा दिवस होता आणि गणवेश म्हणजे खाकी चड्डी आणि पांढरा शर्ट घालण्याचा. अर्थातच वेलणकर (की वेलिंगकर ?) सरांची बोलणी खावी लागली. त्या बोलण्यातला एका वाक्याने मी खूप दुखावलो. " काय रे, हिरो बनायची मोठी हौस आहे तुला?" आईच्या अनेक प्रकारच्या काटकसरीची जाणीव असलेला मी, सरांनी मला असं बोलावं? आणि ते ही कान पिरगाळून ? मी घरी आल्यावर हे सर्व घरच्यांना सांगितलं. योगायोगाने त्याच दिवशी उपासनी काकांचा ( दादांचे मित्र) मुलगा काही कामाने घरी आला. तो आमच्याच शाळेत शिक्षक होता. दादांनी त्याला हे सहज सांगितले. दोन दिवसांनी वेलणकर सरांनी मला वर्गाबाहेर बोलावून पुन्हा झापलं !!!
पहिली फुल पॅन्ट नववीत घालायला मिळाली. ऑलिव्ह ग्रीन रंगाची. न्यारो बॉटम. गणवेशाचा एक भाग. मी कॉलेज मध्ये विविध रंगी कपडे (अमोल पालेकर स्टाईल ) घातले. पहिला ब्लेझर वडिलांनी सांगितलं म्हणून कॉलेज मध्ये असताना शिवून घेतला. मी कॉलेज मध्ये वक्तृत्व म्हणजे वाद-विवाद स्पर्धेत. कॉलेजचे प्रतिनिधित्व करत असे, तर दादा म्हणाले, " एक ब्लेझर शिवून घ्या आता, मुलींच्या कॉलेज मध्ये जात असता ".
पेहराव हा माझ्यासाठी माझ्या ओळखीचा एक महत्वाचा भाग फार दिवस राहिला नाही. कोट हा हिवाळ्यापासून सुरक्षित राहण्यासाठी उत्तर भारतात घातला. videshi बँकेत नोकरी करून सुद्धा मी टाय देखील घालण्याचे टाळत राहिलो. सुदैवाने प्रशिक्षण वर्गात कॅज्युअल हाच ड्रेस कोड असायचा.
अकाली पडलेलं टक्कल झाकायला मी कुठलेही सोपस्कार केले नाहीत, ते सहर्ष स्विकारलं. वयाच्या मानाने माझी दाढी लौकर पांढरी झाली. ती मी सहज मिरवली. त्यामुळे बरीच मानसिक ऊर्जा वाचली असं मला वाटतं. माझी दैहिक ओळख म्हणून मी माझी दाढी मात्र अनेक आकारात अतिशय प्रेमाने जोपासली हे मात्र खरं आणि तिचा मला अभिमान आहे !
आपली आपल्याशीच ओळख वाढायला वेगवेगळ्या लोकांशी आपला संवाद वाढायला हवा. आपलं आपल्याबद्दलचं मत आणि लोकांचं आपल्याबद्दलचं मत यातली दरी कमी करता आली तर सुसंवाद घडतो. नाहीतर वि-संवाद होत असतो.
जोसेफ लुफ्ट आणि हॅरी इंघम. (Joseph Luft आणि Hary Ingham) या दोन मानसशास्त्र्यांनी एक मॉडेल तयार केले, आपला आपल्याशीच आणि इतरांशी कसा संबंध आहे हे जाणून घेण्यासाठी. अतिशय रंजक आहे हे सारे प्रकरण. ह्या मॉडेलला त्यांनी नाव दिले johari विंडो. एकमेकांच्या आत डोकावून बघायला या खिडक्या खूपच मदत करतात. व्यक्ती विकास, चमू बांधणी , नेतृत्व विकास या साठी कार्पोरेट वर्तुळात हे मॉडेल वापरले जाते.
आपल्याबद्दलची काही माहिती सर्वश्रुत असते. आपले नांव, आपले शिक्षण, आपला हुद्दा. कदाचित आपला छंद. मी, श्रीधर जहागिरदार, एम एस्सी, निवृत्त (बँकर) इथे सुरपाखरू म्हणजे लेखक. वर मन मोकळं केलं आहे. अधिक माहिती मी जसजसा लिहीत जाईन तशी वाढत जाईल. कधी भेटलो तर आणखी वाढेल. आपल्या माहितीचे हे खुले दालन .
काही माहिती आपण लपवून ठेवतो. ती खुली केली तर आपल्याला,आपल्या अब्रूला धोका संभवतो म्हणून असेल. आपल्याला त्या माहितीची शरम वाटते म्हणून असेल. ती माहिती व्यक्तिगत असेल किंवा कौटुंबिक असेल. जेवण पद्धत किंवा जीवन पद्धत असू शकते. पूर्वी प्रेमभंग लपवले जात. (आता ते मिरवले जातात.) हे माझ्या माहितीचे गुप्त दालन. मी धाडस करून, धोका पत्करून ह्या दालनातील माहिती काही लोकांशी बोलताना खुल्या दालनात ठेवत असतो.
माझ्या बद्दलची काही माहिती खुद्द मलाच नसते. दुसऱ्यांनी सांगितले तरच मला ती समजते. अगदी सोपं उदाहरण सांगायचं तर आपला सुंदर पेहराव उसवला आहे किंवा झिप उघडी आहे. आपण एका मुलीला आवडतो. हे कुणी सांगितल्याशिवाय मला माहित होत नाही. लोकांचे माझ्याबद्दल काय मत आहे हे कुणी मला सांगत नाही. मला ते ठाऊक नसते. मला लहान मुले आवडतात, त्यांच्याशी बोलायला आवडते. पण माझ्याशी बोलताना ती संकोचतात. कां ते माहित नाही. चौकशी केली तर समजले की माझा मोठ्ठा आवाज हे त्याचे कारण. लग्नानंतर पहिले काही दिवस माझी पत्नी देखील त्या आवाजाला घाबरायची. ते कळायला आपसातला विश्वास वाढावा लागला. हे माझ्या माहितीचे अज्ञात दालन माझ्यासाठी उघडले जाण्यासाठी मला खुले प्रश्न विचारावे लागतील. विश्वास दाखवावा लागेल.
चौथे दालन म्हणजे अंधार कोठडी ! तिथे माझ्या बद्दल काय दडले आहे हे मलाही ठाऊक नाही, दुसऱ्यांना देखील ठाऊक नाही. कधी तरी, एखाद्या अतिशय कठीण प्रसंगी, माझ्याही नकळत, एखादी अज्ञात क्षमता काळोख्या रात्री वीज चमकावी तशी चमकू शकते.
खालील चित्र जोहारी विंडो स्व चा शोध घ्यायला कशी मदत करते हे दर्शवते. इतरांना आपल्याबद्दल काय वाटते हे इतरांकडून समजून घ्यायला हवे. त्या अनुषंगाने आपल्या वागण्या बोलण्यात आवश्यक ते बदल करण्याचा प्रयत्न करायला हवा. धाडस दाखवायला हवं बदलण्याचं.
हा तो कोहम च्या उत्तराचा मार्ग.
लेखक :श्रीधर जहागिरदार
३ जानेवारी २०२६
