ओळख (हेमंत नाईक) ....कसा मी? कसा मी?

ओळख..!!
:writing_hand: हेमंत नाईक
१२. ०१. २०२६

काल रात्री ऑकलंडला साडेतीनला उठून फारच सुंदर झालेले जोशी सरांच सेशन पहिल्यांदा अटेंड केल आणि तुमच्या समोर विषयांची फॅक्टरी पडली आहे असं सांगण्यात आले ते कसे शोधायचे हे देखील कळले आणि अक्षरयात्रीवर ओळख करून द्या आधी सुचना आली होती.. मग मी "ओळख " हाच विषय लेखनासाठी निवडला.

खर स्वतः वर लिहावं का? हा मनात प्रश्न आहे. आपण आत्मप्रौढी तर मिरवत नाही ना. अशी शंकाही आली पण लिहिताना जो विषय आवडला किंवा दिसला त्यावर विचार करून लिहण्याची सवय जडली आहे त्यात सर्व सजीव व निर्जीव वस्तूचाही समावेश आहे.जे पंचेद्रीयाद्वारे तुम्ही अनुभवता त्यावर खुशाल लिहू शकतात… किंबहुना “जे न देखे रवि ते देखे कवि” या उक्ती प्रमाणे अगदी काहीही लिहिण्याच स्वातंत्र्य लिहिताना अनुभवू शकतो.

“असामी असामी” इत्यादी पुलंच्या विनोदी लेखनाचे लहानपणी पारायणे झाली असली तरी अजूनही पुलंचे पुस्तकं हातात आले की परत एकदा वाचून काढणारा
मी , मोठा आसामी नसलो तरी पुलंच्या असामी असामीचा चहाता आहे.वपु ही माझे आवडते लेखक आहे. तीस वर्षापूर्वी..बरोबर पूर्ण दिवसभर त्यांचा सहवास लाभलेला आणि त्यांचे एक दिवस सारथी बनण्याचें भाग्य मला लाभले आहे.

मी हेमंत नाईक बी ई,
शासकीय अभियांत्रिकीचा विदयार्थी १९८४चा पास आउट..ही माझी शैक्षणिक ओळख असली तरी वय वर्ष आठ पासून मी भुसावळच्या वाचनालयात बालविभागापासून पदसिद्ध वाचक होतो. लेखन हे करिअर होऊ शकते यावर इतरांच्या आईवडीलाप्रमाणे माझ्याही आईवडिलांचा विश्वास नसल्याने हॉस्टेलचे सुखद अनुभव घेऊन इंजिनीअर झालो.घरांची रचना करता करता मित्रांच्या आग्रहाने वयाच्या साठीत शब्द रचना करत लिहू लागलो.

बहुतेक लेखकांची अशीच काहीशी सुरुवात असेल. तस म्हणाल “ओळख” हा विषय खूप मोठा आहे गीता प्राचीन महाभारतात सांगितली असली तऱी तिच्यावर अजूनही नविन दृष्टीने प्रकाश टाकला जातो आहे पी. एच. डी. केली जात आहे.

वैयक्तिक ओळखीच्या बाबतीत प्रत्येकाची शासकीय सामाजिक आणि कौटुंबिक ओळख एकदम वेगवेगळी असू शकते. ऑफिस मधे एकदम वाघासारखा डरकळ्या फोडणारा कडक शिस्तीचा ऑफिसर घरी मात्र भित्रे मांजर बनून बायकोपुढे म्याऊ म्याऊ करत असल्याचे आपण काही ठिकाणी बघतो.

रोटरी सदस्य असताना खूप जणाची ओळख करून देण्याची जबाबदारी माझ्यावर आली होती. कमीत कमी शब्दात पण प्रभावी ओळख करून देणे ही कला आहे.नाहीतर काही जण ओळख करून देतांना वक्त्याच्या भाषणापेक्षा जास्त लांबवतात. एका ठिकाणी ओळख करून देतांना खूप वेळ लागतोआहे हे पाहून कंटाळलेल्या वक्त्याने मध्येच ओळख करून देणाऱ्यास थांबवून आता उरलेली ओळख भाषाणातून करून देतो असे म्हणून भाषण सुरु केल्याचे मला आठवते.

कुणाचे नाव कधीच बदलत नसले तरी तुमच्या कार्याने, वयाने तुमची ओळख कालपरत्वे बदलत असतें.. जसेकी आज चि. कियान चि. कबीरचा आजोबा ही माझी ओळख मला सर्वात प्रिय आहे.

ओळख कशी करून देऊ नये? यावर विचार करताना मला आवडणारा चेतन भगत याच्या लिखाणावर आधारित अमीर खानच्या चित्रपट थ्री ईडिअट मध्ये मंत्री महोदय यांची चतुर रामलिंगमने करून दिलेली ओळख आठवते. हसूनहसून पुरेवाट झाली होती तेव्हा. या चित्रपटात इंजिनीरिंगचे आमचे COEP चें जीवन जणू या समोर दिसत होते. आमचे प्रसंग,पात्र, कथा वेगळ्या असल्या तरी मैत्रीची भावना मात्र ती नक्की एकच होती.बहुतेकांचा कॉलेज जीवनाचा असाच अनुभव असेल.

काही जणांना खूप वर्षांपासून ओळखूनही आपण ओळखले नसते तर काही अनोळखी मंडळी सारख्या आवडीच्या धाग्यामुळे ओळखीचीची वाटतात.. आणि मग सुरही लागलीच जुळतात. वर्षभर सुरपाखरांच्या थव्यात प्रवास केल्यावर हाच अनुभव सर्वांनाच येईल… अशी खात्री आहे.

असा मी ??
असा मी ??

लिहितो किती तरीही
शब्द न मोजतो मी
लिहीवणारा वर आहे
तो एक मानतो मी..

भाषेचा असता कागद
अनुभवाची ती शाई
निर्मळ खरं ते लिहीतो
स्वछंदी मला मानतो मी..

जे मनात माझ्या आहे
तेच कागदावर येते
कागद कधी कधीते
कोरेही ठेवतो मी..

लिहीण्यात आजच्या हो
इतिहास तो उद्याचा
नातवांना सांगण्याला
हाती घेतो लेखणी मी

बीज आहे लेखनाचेही
सर्वत्र मुबलक पसरलेले
ढीग लेख कविताचे
लिहीतो अन वाचतो मी..

लेखनाच्या नशेचा
डंख जेव्हा डसतो
लिहून पूर्ण ते होता
आनंदोत्सव करितो मी..

या कवितेतील “मी” हा आपल्या सारख्या सर्व लेखकांचे प्रतिनिधित्व करतो.

…हेमंत नाईक

सुरपाखरू#३०दिवसात३०#प्रयोग२०२६