पूषा इतवार ! - एक वैज्ञानिक प्रथा

पूषा इतवार!

पूषा इतवारी (पौष महिन्यातला रविवार) सकाळीच म्हातारीने शिदोरी बांधली आणि सूर्यनारायणाला जेऊ घालायला निघाली. तो उगवताच त्याच्या मागे लागली " येरे नारायणा जेव रे नारायणा… नको रे त्रास देऊ "

तो जिकडे (पश्चिमेस कडे) जायचा,तिकडे त्याच्या मागे मागे दऱ्या डोंगरं ओलांडत जायची. शेवटी त्याला दया यायची आणि तो खाली उतरून सगळी शिदोरी संपवायचा. मग कुठे तिला बरं वाटायचं. घरी जायची, सुनेला वाटायचं म्हातारीनेच शिदोरी खाल्ली म्हणून तिला जेवायला द्यायची नाही. शेवटच्या पूषा इतवारी ती मग सूर्याच्या मागे लागली तूच शिदोरी खाल्ली म्हणून तुझी काही तरी खूण दे. त्यानी म्हंटलं तुला जितकी दगडं उचलून नेता येतील तितकी गाठोड्यात भरून घेऊन जा. त्या रात्री गाठोड्यातली सगळी दगडं, हीरे, माणकांमधे परिवर्तित झाली आणि सुनेला पटलं हा सूर्यनारायणाचाच आशिर्वाद आहे. तिनी सासूच्या पायावर लोटांगण घातलं. म्हातारीला सूर्यनारायणाचा आशिर्वाद लाभला तसा सगळ्यांना लाभो… ही आईची गोष्टं संपली कि आम्ही सूर्य नारायणाला नमस्कार करून जेवायला सुरवात करायचो.

पूषा इतवार हा छोटासा सण/उत्सव म्हणा किंवा पूजा म्हणा आधी बऱ्याच घरांमधे व्हायची.

सकाळीच तुळशी समोर सारवून/सडा टाकून रांगोळी ने सूर्य काढल्या जायचा. त्या दिवशी सगळ्यांना सुट्टीच असायची म्हणून शिकेकाईने नहाणे हा एक प्रकार त्या दिवशी असायचा. सगळ्यांच्या आंघोळी होईस्तोवर आई, स्वयंपाकीण बाईंच्या मदतीने वालाच्या शेंगांची भाजी, डाळ भाजी, पोळी, वरण, भात, कढी, भजे, काही तरी गोड असं सगळं करण्यात गुंतली असायची. घर भर त्याचा दरवळ असायचा. ताटातली डावी कडची बाजू (चटण्या, कोशिंबिरी) तयार करणे, फुलं तोडणे, हार करणे, जेवणासाठी बाजूचे अंगण सकाळीच पाईपने पाणी घालून स्वच्छ धुणे हे सगळं घरातिल मुला/मुलींच्या जिम्मे असायचं. बाबा देवपूजा आटपायचे.

स्वयंपाक, पूजा झाल्यावर सगळे तुळशी जवळ काढलेल्या सूर्यनारायणाला आणि आकाशातल्या खऱ्या सूर्यनारायणाला हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून ओवाळायचे.

सगळा स्वयंपाक, ताट वाट्या पेले पाणी बाजूच्या अंगणात आणल्या जाई. पंगत बसली की जेवण सुरू करण्या पूर्वी आई पूषा इतवारची गोष्टं सांगत असे. दर रविवारी वेगळी गोष्टं तयार असायची तिची. कधी आवडती राणी - नावडती राणी ची गोष्टं, कधी म्हातारी अन कोहळ्याची गोष्टं अन अश्या अजून बऱ्याच! छान साभिनय गोष्टं सांगायची. आम्ही गोष्टं ऐकण्यात तल्लीन होऊन जायचो. मन लावून गोष्टं ऐकली की जेवणावर ताव मारायचो.

डिसेंबर - जानेवारी ची कडाक्याची थंडी असायची, त्यात असं उन्हात बसून जेवणं म्हणजे एक छोटी पिकनिकच असायची. वर्षभर आम्ही पूषा इतवाराची वाट बघायचो.

तसेही बैतूल (माझं माहेर) हे डोंगरांमधे वसलेलं एक टुमदार हिल स्टेशनच आहे. आम्ही लहान होतो तेव्हां जास्तच थंडी असायची त्यामुळे हिवाळ्यात बरेचदा उन्हात बसून जेवणं व्हायचे. बैतूलच्या आसपास नैसर्गिक दर्शनीय स्थळं पण खूप आहेत. त्यामुळे तिथे लोकांना पिकनिकची फार आवड आहे,आम्हाला ही होती.

आपल्या ह्या भारतीय प्रथा खूप वैज्ञानिक आहेत. हिवाळ्यात व्हिटॅमिन डी ची कमतरता होते ज्यामुळे शारीरिक व मानसिक आरोग्य खालावतं. म्हणून सूर्याची अशी उपासना ज्यात सगळे हसत खेळत एकत्र जेवतात त्याने एकमेकांचा मानसिक आधार मिळतो आणि उन्हात जेवल्याने सहजच सूर्य किरणांनी मिळणार व्हिटॅमिन डी शरीरात वाढतं. शिवाय त्याचा प्रसाद म्हणून ऋतुनुसार भाज्या, फळं आवडो न आवडो खाल्ली जातात ज्या शारीरिक, मानसिक आरोग्या साठी अत्यंत आवश्यक असतात.

पूषा इतवाराची प्रथा पुन्हा घरोघरी सुरू होवो आणि सगळ्यांचं आरोग्य सुदृढ राहो ही सूर्य नारायणा चरणी प्रार्थना!

सई देशपांडे

11.01.2026

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६