कथा मालिका : जावईपुरम भाग ४

हा कथा मालिकेतला एक भाग आहे, तुम्ही सुरवातीपासून वाचलेले नसेल तर पहिल्या भागाचा दुवा घेऊन तिथून सुरवात करावी.


वैभव ने त्याला दिलेली कामांची यादी पुन्हा एकदा वाचली. आजचा सकाळच्या जेवणाचा बेत त्यालाच ठरवायला सांगितला होता .

मराठी माणसाचे घर आहे हे पाहून त्याने आगळा वेगळा बेत ठरविला …

गोळा-तांदूळ , चिंचेचा सार, हिंग लाल मिरच्या घालून कढवलेले तेल , उकडलेल्या बटाट्याची भाजी , दशम्या ,ताक, हिरव्या मिरचीचा ठेचा . आणि स्वीट डिश म्हणून मस्त सुका मेवा घातलेला, जायफळ विलायचीचा स्वाद असलेला रव्याचा शिरा . वरून हवे तर केशर ही पेरू.

आपण केलेल्या बेतावर तो स्वतःच खूप खुश झाला . त्याचे हात भराभर चालू लागले . त्याबरोबर त्याचे विचार ही वेगाने सुरू होते. लतिका कडे त्याने चोरून चोरून पाहिले होते. त्याच्या मनाच्या कोपर्‍यात कुठेतरी तिने घर केले होते म्हणूनच तो तिला खुष करण्यासाठी धडपडत होता.

दुसरे कारण असेही होते की इथून नकार घ्यायचा आणि दुसर्‍या घरी जावून पुन्हा नव्याने आपले इम्प्रेशन तयार करण्यासाठी धडपड करायची . ते त्याला नकोसे वाटत होते .

ठीक १२ वाजता सगळे काम आटोपून . तो किचन मधून बाहेर पडला . टेबल वर सगळे नीट मांडून तो फ्रेश व्हायला गेला . व्यवस्थित तयार होऊन तो १२.२५ ला हसतमुखाने जेवण्याच्या टेबलाजवळ हजर होता . ठीक १२.३० सर्व मंडळी जेवायला हजर झाली .

तिथली जय्यत तयारी बघून सगळेच खुष झाले. लतिका च्या चेहर्‍यावर हसू पाहून वैभव पण खुशीत आला. त्याने सगळ्यांना वाढायला सुरवात केली.

त्याला आता आईच्या ट्रेनिंगची खरच तारीफ करावीशी वाटत होती .

डाव्या भागाला मीठ , ठेचा, लिंबाच गोड लोणचे वाढून होताच त्याने भाजी वाढली. ताका च्या वाट्या भरून दिल्या. हे सर्व करताना तो लतिका च्या चेहर्‍यावरचे भाव गुपचूप निरखीत होता .

शिर्‍याचे बाउल भरून त्याने ताटाच्या बाजूला ठेवले. इथपर्यंत सगळ्यांचे चेहरे फार खुष दिसत होते . आता त्याने गोळा तांदूळ वाढायला सुरवात केली.

ओह यलो राइस…लतिका चे पुटपुटणे त्याच्या कानावर पडलेच . त्यावर तेल वाढायला सुरवात केली तेव्हढ्यात लतिका चा फोन वाजला आणि ती उठून थोडी बाजूला गेली . तोवर वैभवने तिच्याही भातावर तेल आणि तळलेली लाल मिरची वाढली.

लतिका ही फोन वर बोलून परत आली . भातावर ते तेल आणि मिरची पाहून ती जवळपास किंचाळलीच…

ओह…नाही नाही … इतके स्पाईसी जेवण …माय गॉड… मी नाही खाऊ शकत… यू स्टुपीड … कोणी सांगितल तुला असा बेत करायला…

तिच्या तोंडाचा पट्टा थांबायचे नावच घेत नव्हता . बाकीच्यांनी कसेबसे जेवण आटोपले आणि आपापल्या खोल्यात निघून गेले . वैभव भांबावून सगळ्यांकडे पाहात राहिला.

आता तिथे तो आणि लतिका हे दोघेच उरले होते . तिने त्याच्याकडे अतिशय खुनशी नजरेनी पहात फोन हातात घेतला . तिने एक नंबर फिरवला .

हॅलो, शाह अंकल मी लतिका बोलते आहे . अंकल वैभव ला तुम्ही येऊन घेऊन जा . मला तो माझ्या नजरे समोर अजिबात नकोय…

ठीक आहे . १ तासात त्याला तयार राहिला सांगते.

त्याच्याकडे रागाने पहात लतिका ने त्याला आपला गाशा गुंडाळायला सांगितला. ठरल्याप्रमाणे २ दिवस ही थांबायची तिची तयारी नव्हती . किंवा त्याचे काय म्हणणे आहे हे ही तिला ऐकून घ्यायचे नव्हते.

अपमानित होऊन आणि खाली मान घालून तो तिथून चालता झाला .

बिचारा वैभव . त्याने आईच्या शिकवणी नुसार दोन घास कसेबसे पोटात ढकलले होते .

सगळे काम आटोपून तो शाह अंकल ची वाट पाहू लागला .

                                          क्रमशः 

:person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running::person_running:

काय तुम्हाला तुमच्या मुलाचे भविष्य असे असावे ह्याची कल्पना करवते का ?

विचार करा …

तुम्हाला जागे करण्याचा प्रयत्न करतेय म्हणून नक्की समीक्षा द्या .

©️®️सौ मंजूषा श्रीकांत अपराजित

सुरपाखरू ३०दिवसात३० प्रयोग२०२६


मालिकेतिल पुढचा भाग: जावई पुरम भाग ५