फोटोग्राफी आणि अध्यात्म

फोटोग्राफी आणि अध्यात्म!

“The camera is an instrument that teaches people how to see without a camera” - Dorothea Lange

अमेरिकन फोटोग्राफर ‘डॉरथी लँग’ हिचं हे वाक्य माझ्या अतिशय आवडीचं आहे - कॅमेरा एक असं अस्त्र आहे जे लोकांना कॅमेऱ्या शिवाय (जगा कडे) कसं बघायचं हे शिकवतं, म्हणजेच जगाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोण देतं.
मला लहानपणात पासूनच फोटोग्राफी ची आवड होती, जी माझ्या बाबांकडून आली. बाबांनी 1971- 72 सालीच ब्लॅक अँड व्हाईट कॅमेरा घेतला होता त्या कॅम पासून नंतर वेगवेगळे कॅमेरे वापरलेत आणि जेव्हां पासून माझा 83× झूम असलेला निकॉन कूलपिक्स कॅम आला आहे तेव्हा पासून तर तो माझा हमसफर झाला आहे. प्रवासात कुठेही गेले तरी तो माझ्या सोबत असतो.

हा कॅम 2016 मधे स्पेशली चंद्राचे फोटो घ्यायला घेतला. गणितात मास्टर्स करत असताना स्फेरिकल ट्रिग्नॉमेट्री आणि अॅस्ट्रॉनॉमी चा अभ्यास करताना ग्रह, नक्षत्र, ताऱ्यांवर प्रेम जडलं आणि त्यात ह्या कॅम नी भर घातली. ग्रह, ताऱ्यांचा कॉलेज मधे अभ्यास करताना हे किती मोठे आहेत हे समजत होतं पण उमजत नव्हतं. ह्या कॅम ने जेव्हा आकाशीय सौंदर्याकडे बघायला लागले तेव्हां ब्रम्हांडाच्या भव्यतेची जाणीव झाली आणि ज्याची ही सगळी दिव्य रचना आहे त्याच्या समोर नतमस्तक झाले, आणि आपण देखिल ह्या भव्य दिव्य ब्रम्हांडाचाच एक भाग आहोत हे जाणून चमत्कारिक तरी सक्षमतेचा भाव पण आला…

तसेच पृथ्वी वरील नदी, समुद्र, पशू, पक्षी, झाडं, फुलं ह्यांचं वागणं कॅमेऱ्यातून बघताना आपण जास्त बारकाईने बघू शकतो आणि लक्षात येतं हे सगळे देखिल एका अलिखित नियमा प्रमाणे आपसात ताळमेळ साधून शांतपणे आपापली भूमिका पार पाडत असतात. मग मन, हा अलिखित नियम सांगणारा कोण ह्याचा वेध घ्यायला लागतो. आणि मग स्वतःत पण त्या अलिखित नियमा प्रमाणे सहज बदल घडतो.

भारतीय ऐतिहासिक वास्तू/मंदिरं जेव्हां कॅम मधून बघतो तेव्हां आपल्या भारतीय ज्ञान परंपरे बद्दल अवाक व्हायला होतं. स्थापत्यकलेचे, मूर्तीकलेचे बारकावे दिसायला लागतात आणि त्या आपल्या पूर्वज कलाकारांच्या समर्पणा समोर नतमस्तक होतो आणि समर्पण म्हणजे काय हे शिकतो.

शहरांच्या उंच इमारती,विमानं, जहाजं, मोठाले, ब्रिजेस, रस्ते तर कुठे झोपड्या, बैलगाड्या, मातीत पाय रोवलेले शेतकरी, धूळ, शेळ्या, उंटं हाकणारे बंजारे असं जगण्यातलं वैविध्य पण कॅम मधून बघताना ते कॅम सोबतच मनावर पण कोरल्या जातं आणि मानव हा किती वेगळा प्राणी आहे हे लक्षात येतं आणी मोक्ष प्राप्ती करून घ्यायची असेल तर मानव जन्मच का महत्वाचा आहे हे कळतं.
सगळ्याच कलांची बारकाव्याने/समर्पणाने साधना केली तर ती मोक्ष प्राप्ती कडेच नेते तशीच आध्यात्मिक उन्नती कडे नेणारी फोटोग्राफी ही पण कला आहे.

सई देशपांडे
10.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026
#photography #spirituality