वेळेलाही तो निवांत वेळ.... असे इच्छा जर मनातूनी!

वेळेलाही तो निवांत वेळ
असे इच्छा जर मनातूनी!

लेख क्रमांक १०
.. हेमंत नाईक
१०. ०१.२०२६

वेळ जीवनात मोजकीच असते तुम्हाला देवाने श्वासही मोजून दिले असतात.. वेळेचा वापर तुम्ही कसा केला यावर तुमच्या कर्तृत्वाचे मोजमाप होते. Time is money या इंग्लिश वाक्यात वेळचे महत्व अधोरेखित केले आहे.
आयुष्यात वेळ किती महत्वाची आहे हे सांगणारा संत कबीरांचा दोहा आठवतो,
“काल करे सो आज कर,
आज करे सो अब।
पल में प्रलय होएगी,
बहुरि करेगा कब”
याच मतितार्थ
“कोणतेही काम उद्यावर टाकू नका.. पुढचा क्षण तुमचा आहे का? याची खात्री देता येत नाही.”

कितीही नियोजन केले तरी जेव्हा आयुष्य पुढे जाते तेव्हा ही गोष्ट करायची राहून गेली अशी भावना बऱ्याच वेळा येते. नंतर ती करणही कठीण असते म्हणून वेळेच महत्व. वेळेवारी सर्व गोष्टी होणे.. हेही तितकेच महत्वाचे!

बहुतेकजण निवृत्तीनंतर लिखाण गायन वादन आदी छन्द जोपासतात कारण उपजीविकेसाठी कमवण्याच्या नादात त्यांना त्यांच्या आवडीकडे लक्ष देण्यास वेळही नव्हता… असा खूप जणांचा दावा असतो.

गुंतला गुंत्यात इतका
आपुल्या जीवनात तू
वेळ काढायचा कसा तो
ऐक या काव्यातुनी..

वेळ काढायला वेळ नव्हता
नित्य खोटा दावा तुझा
वेळेलाही निवांत वेळ तो
इच्छा तुमची जर मनातूनी..

जगायला वेळ नव्हता
मरण आले दारावरी
वेळ नाही आज मजला
सांगू कसे यमालाही..

यायला जमत नाही असे सांगून बऱ्याच वेळा आपण खूप कार्यक्रमाला जाणे टाळत असतो.. पण वेळ ही काढावी लागते.

माझा एक पोलिओग्रस्त मित्र कपडाचे दुकान चालवत होता Time mangement करण्याची त्याची पद्धत वेगळी होती रोज डायरीत काम लिहिण्याची सवय त्याने अंगीकारली होती.. दोन्ही पायानी अपंग असून सुध्दा बनारस मुंबई बगलोर येथे खरेदीचे दौरे तो लिलया पार करत होता दुकानही चांगले जोरात चालवत होते.. उत्तम वेळेचे नियोजन असल्याने हे करायचे राहिले किंवा इथे जाऊ शकलो नाही असे शब्द त्यांचेकडून मी कधीच ऐकले नाही वेळेचे महत्व ठेवले तर काळाबरोबर चालू शकतात हे तो जाणून होता.

“वेळ जाण्यासाठी केलेले कार्य..” असा टाईमपास शब्दश:अर्थ असला तरी व्यर्थ वेळ वाया घालवला असाही त्याचा एक अर्थ जनमानसात आहे!!

खरं तर रोज काहितरी लिहिणं हे कठीण आहे विषय ओढून ताणून ठरवला तर लिखाणात दम रहात नाही.. तरी लिहिण्याचे शिवधनुष्य मी उचलले आहे.

रोज लिहिण्यास विषय मिळेल का?
त्या विषयावर लिहिण्याची माझी पात्रता आहे का?
मी लिहून काय साध्य करणार आहे? असे अनेक प्रश्न मनात येतात.

इच्छा असेल तर मार्ग दिसतो, शोधल तर सापडेल.. हा नियम विषयाच्या बाबतीत ही लागू पडतो..

पात्रता सर्वात असतें फक्त तिची ओळख पटवावी लागते.. आणि आता साठीत काही साधण्यासाठी वा मिळवण्यासाठी नव्हे तर स्वान्त आनंदासाठी व तो वाटण्यासाठी करायचे असतें हीं भावना ठेवून लिहिणार आहे. रोज काय लिहिलं जाईल..हे आज मलाही माहित नाही..
आवडल तर तुमचाही टाईमपास होईल नाहीतर टाईमपास होता म्हणून दुर्लक्ष करा..

वेळ निघून गेली!!

अवचित निघून जाते
नाही मुठीत ती येते
सतत पुढे ती सरते
नाही मागे वळते
अचानक मग कळते
वेळ निघून गेली!!

मनात काही येता
का उगाच थांबता
नको प्रश्न हा मनाला
काय म्हणेल जनता
वाटेल तुम्हा जेव्हा
लागलीच व्हा करता
नाहीतर वाटेल पुन्हा
वेळ निघून गेली!!

टिक टिक घडयाळ वाजे
गोल तेथेच फिरता काटे
तैसेचि रोजचे हे जिणे
तेच तेच का उगा करणे
मना विरुद्ध का वागणे
सरणावर अंती कळते
वेळ निघून गेली!!

काहीही म्हणून मी लिहितो
मंचावर पोस्ट करतो
कसली ना मनी चिंता
वेळेचा उपयोग करता
प्रश्नाचे उत्तर मिळता
वेळेवर स्वार हो होता
लेख कविता लिहिता
टाईमपासही सुंदर होतो
मग मनी प्रश्न न उरतो
वेळ का निघून गेली

… हेमंत नाईक
१०. ०१. २०२६
सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग२०२६

1 Like