पत्रपेटी - भारतीय डाक

पत्रपेटी - भारतीय डाक!
बिलासपुरला एका मीटिंग नंतर ड्रायव्हरची वाट बघत उभं असताना बाजूलाच नटून थटून बसलेल्या ह्या पत्र पेटी कडे लक्ष गेलं. आईनी पहिलीत असताना पत्र लिहायला शिकवलं आणि ह्या पत्र पेटीत टाकणं शिकवलं त्या पत्रा पासून नंतर लिहिलेली अनेक पत्रं, पोस्ट्स च्या असंख्य आठवणी मनात तरळून गेल्या आणि न राहवून तिच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवून तिच्या सोबत एक फोटो काढूनच घेतला!

आता ह्या पत्र पेट्या पोस्टाने वापरणं बंद केलं आहे. सध्या तरी त्या दिसताहेत पण कधी काढून टाकण्यात येतील सांगता येत नाही…

लहान असताना नातेवाईकांना आई, बाबांनी लिहिलेली पत्रं, दिवाळीचे ग्रीटींग्ज ह्या पत्र पेटीत टाकण्यासाठी आम्हा बहिणिंचे भांडणं व्हायचे.. त्यात पत्र टाकणं म्हणजे खूप प्रेस्टीजियस वाटायचं पत्र खाली पडल्यावर जो आवाज यायचा तो ऐकण्याची पण एक वेगळीच मजा होती. नंतर मोठं झाल्यावर पत्र ही लिहायला लागले आणी दिवाळी व नववर्षाचे ग्रीटिंग्स, पेंटिंगची आवड असल्याने घरीच तयार करायला लागले. आम्ही सगळ्या बहिणी कलाकार आहोत त्यामुळे ग्रीटिंग्ज तयार करताना खूप मजा यायची. कुणा कुणाला पाठवायचे त्याची लिस्ट आई बाब द्यायचे.
आईनी मामाला पाठवलेली राखी, बाबांना सगळ्या आत्यांनी पाठवलेल्या राख्या, संक्रांतीचे लिफाफ्यात ‘तिळगूळ घ्या गोड गोड बोला’ असं लिहिलेल्या पत्रा सोबत हलव्याचे रंगबिरंगी दाणे, चिमुट भर तिळगूळ हे सगळं सगळं ही पत्र पेटी आपल्या पोटात जिव्हाळ्याने सांभाळून ठेवायची जेणे करून योग्य जागी हे प्रेम पोहोचवल्या जाईल.
तरुणांचे नोकरी साठीचे अर्ज, त्यांच्या भविष्याचे स्वप्नन, नवीन लग्न ठरलेल्यांचं लाजाळू हितगुज हिच्या, सासुरवाशीण मुलीचं माहेरपण सगळं हिनी खूप समंजसपणे सांभाळलं.
युद्धावर गेलेल्या धाडसी सैनिकांच्या हृदयातला हळवा कप्पा घरच्यांपर्यंत पोहोचवायचं काम देखिल हिनी केलंय.
तेव्हां पोस्ट करण्यात जी आत्मीयता वाटत होती ती आता जरा कमी झालीय.
आता पोस्ट करणं एका सेकंदात होतं.. पोस्ट करणं हा शब्द आता सोशल मीडिया साठीच जास्त वापरल्या जातो. जे काही आपण पत्राने लिहून पाठवायचो ते सोशल मीडियावर पाठवून मोकळे होतो. हे पण तसं बघितलं तर वाईट नाहीये पण ह्या पत्र पेटी चा काळ अनुभवणारी आपली शेवटची पीढी आहे. तो काळ माझ्या साठी अविस्मरणीय आहे.

सई देशपांडे
09.01.2026

सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026

#IndiaPost #letterboxd #letters #memories