मधुकामिनी (कथा) - भाग 2
तिच्या सासूबाईंना कॅन्सर डिटेक्ट झाला होता. फक्त सहाच महिने आहेत त्यांच्या कडे असं बोलले होते डॉक्टर.
“आईंनी काही त्रास होतोय हे मला आधी का नाही सांगितलं?” हा विचार करून तिला खूप असहाय वाटत होतं. इतक्या पेशंट्स ला बरी करणारी मी… आईंना काहीच होऊ दिलं नसतं… पण आता वाट बघण्या शिवाय काही उपाय नाही कारण त्या कीमो थेरपी वगैरे कसलीच ट्रीटमेंट घ्यायला तयार नव्हत्या." मला शांततेत फार्म हाउसवर झाडाझुडपांमधे पशू पक्ष्यांमधे शेवटचे दिवस काढू द्या" इतकंच त्या सतत म्हणत होत्या. हिचा नाइलाज होता. अविनाश असता तर त्याने आईला समजावून सांगितलं असतं पण त्याला जाऊनही 20 वर्षं होत आली.. कार ड्राइव्ह करता करता असंख्य विचार, असंख्य आठवणी तिच्या मनात हैदोस घालत होत्या. अविनाश गेला तेव्हां संचिता सहाच वर्षाची होती. त्याचं अॅक्सीडेंट मधे जाणं आईला, तिला, संचिताला हादरवून सोडणारं होतं. आई वयस्कर, संचिता अगदीच लहान… तिला खंबीरपणे उभं राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आता येत्या काही महिन्यांत संचिताच्या ही लग्नाची तारीख काढायची आहे. लग्न झाल्यावर ती अमेरिकेत जाणार… विचार करतच ती घरात आली. आई आणि संचिता आधीच हॉल मधे येऊन बसल्या होत्या.. तिला बघून दोघी उभ्या झाल्या. आईने तिचा हात हातात घेतला “हे बघ बेटा मी तुला आधी काही सांगितलं नाही ह्याचं अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस… तू माझी मुलगीच आहेस मी तुला सून म्हणून कधी बघितलंच नाही. अवी गेल्यावर तुझ्या साठीच इतकी वर्ष जगले गं. मी, संचिता आणि हॉस्पिटल हे सांभाळताना तुझी जी दमछाक व्हायची ती दिसत होती मला. तरी तू इथ पर्यंत सगळंच उत्तम रीत्या सांभाळलंस, आपल्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा सगळं एकीकडे ठेऊन. आता मला फार्म हाऊसवर जाऊदे. तुम्ही दोघी अधून मधून मला भेटायला यालंच की “..” मला ही आजीचं पटतंय आई, तिला काही त्रास झालाच तर तिथेही बेसिक हॉस्पिटलच्या सोयी आहेतच नं? मला असं वाटतं ती जितकी जास्त नेचर जवळ राहील तितकी ती आनंदी राहील “…
“वाटल्यास मी आणी सुबोध रोज लॉंग ड्राइव्हला आजीकडेच जात जाऊ.. हो न आजी?” संचिता म्हणाली.” बरं आजी पुढचं बोल नं…” संचिता हळूच आजीला म्हणाली…प्रीतीने प्रश्नार्थक नजरेने आई कडे बघितले.. आई नी मोठा श्वास घेतला प्रितीच्या पाठीवर हात ठेवत तिला सोफ्यावर बसवले. तिच्या बाजूला बसून मायेनी तिचा हात हातात घेतला. दुसऱ्या बाजूला संचिता ही येऊन बसली. प्रीतीला कळेचना ह्या दोघी कुठला गौप्यस्फोट करणार आहेत.
“हे बघ बेटा, आता मी फार्म हाऊसवर जाणार आणी तिथेही किती दिवस राहणार देवालाच ठाऊक, काही महिन्यात संचिता पण अमेरिकेत निघून जाईल. तिचं काही सारखं इथे येणं होणार नाही. आता पर्यंत मी कितीदा हे म्हंटलंय पण तू नेहमीच मला उडवून लावलंस, आम्ही दोघी आणि पेशंट्स इतकंच तू आपलं जग करून घेतलं होतंस. पण आता आम्ही दोघी तुझ्या सोबत राहणार नाही. अजून बरीच वर्षं तुला हे जग अनुभवायचं आहे. आम्हा दोघींना असं वाटतं की तू एकटी राहू नये.”…थोडी हिम्मत आणून त्या पुढे बोलल्या " आमची इच्छा आहे तू लग्न करावंस…"
" आई काही बोलताहेत तुम्ही… छे छे हे मला नाही जमायचं".. ती झटक्यात उठून बोलली.. “हे बघ लाइफ पार्टनर शिवाय जगणं काय असतं ते मला चांगलंच माहितिये गं. अवि माझा मुलगा होता पण आता तूच माझी मुलगी आहेस. तुझं असं एकटं राहणं देखवत नाही मला. तू लग्नाला होकार दिलास तर मी निश्चिंततेने जीव सोडीन.” तिच्या जवळ येत आई म्हणाल्या. संचिता ही जवळ आली “आई माझी पण इच्छा आहे माझं कन्या दान तुम्ही दोघांनी करावं”..
" हे काय झालंय तुम्हा दोघींना आणि तुम्ही तर असं बोलताय जसं लगेच माझं लग्न करणार आहात… कुणी शोधून तर नाही ना ठेवला तुम्ही? " दोघींकडे बघत तिनी विचारलं.
“हो” दोघी एक स्वरात बोलल्या. “काssssय?”.. आश्चर्याने डोळे विस्फारत तिने विचारले..
“डॉ शशांक” आईनी शांत स्वरात निर्णय सुनावला.
नाव ऐकल्यावर ती थोडी गडबडली.." पण असं कसं शक्य आहे? "
" का शक्य नाही आई? शशांक काका किती लक्ष देतो आपल्या तिघींकडे, हॉस्पिटल सांभाळण्यात पण तुला किती आधार आहे त्याचा. आणि कॉलेज डेज पासूनच ओळखतेस ना तू त्याला? " तिला पटवायच्या स्वरात संचिता बोलली
“अगं पण तो माझा जुनीयर होता. माझ्या पेक्षा तीन वर्ष लहान आहे तो”
" एका वया नंतर वयातलं अंतर काही मॅटर नाही करत ममा.. आय डोन्ट नो इफ यू नोटिस्ड अॉर नॉट बट ही इज डीपली इन लव्ह विद यू.. त्याने अजूनही लग्न का नाही केलं सांगू शकतेस? मी सांगते… हेच कारण आहे. आम्ही त्याच्याशी बोललोय ह्या विषयावर. हो नं आजी? "
" काऽऽऽऽय एका वर एक तोफा डागत चालल्या आहात तुम्ही दोघी तर"
" शशांक येईलच थोड्या वेळात, माझ्या कडे वेळ खूप कमी आहे गं म्हणून थोडं घाईत करतेय हे सगळं. जा लवकर फ्रेश होऊन ये. दोघं जरा बाहेर जाऊन या.. काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. 8,10 दिवसात मी जाण्यापूर्वी रजिस्टर्ड मॅरेज करून घेऊ या" आई मोठा श्वास घेत बोलल्या…
ती आरशासमोर उभी होती… गोंधळलेली… पण तरी कुठेतरी एक आनंदाची झुळुक तिच्या मनात सुगंध पसरवत होती. ती अविनाशला विसरू शकली नव्हती पण शशांकच्या सान्निध्यात तिला वेगळीच ऊब जाणवायची. रिलॅक्स्ड असायची त्याच्या सोबत असताना. आई आणि संचिताचं बोलणं कुठेतरी तिला पटत होतं… विचार करता करताच तिनी खिडकी उघडली आणि मधुकामिनीचा सुगंध भरभरून तिला स्पर्श करत सगळ्या खोली भर दरवळला.. हा सुगंध तिच्या अत्यंत आवडीचा होता. खालीच झाड होतं. अविनाश असताना हॉस्पिटल मधून येताना कार पार्क केली की ती एक बहरलेला गुच्छ बेडरूम मधे ठेवायला घेऊन यायची. अविनाश गेल्या पासून ह्या सुगंधाकडे ती दुर्लक्षं करायची…
आज पुन्हा ही खिडकी तिला उघडाविशी वाटली. आज मधुकामिनी पुन्हा बहरली होती!
सई देशपांडे
08.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026