लेख क्रमांक ६
" पराधिन आहे जगती पुत्र मानवाचा-२ "
हेमंत नाईक
०६. ०१. २०२५
कँसर म्हणल तर अगदी डोळ्यापुढे साक्षात काळ उभा राहतो.. पण दिनेशचे रसायन काही वेगळेच होते. जस काही काहीच झालं नाही असा त्याचा सर्वत्र वावर होता त्याच्या ऑफिसमध्येही तो ऍक्टिव्हली काम करत होता. आम्ही सर्व मित्र मात्र चिंतेत होतो.
जुलै २४
दिनेशच्या दोन्ही केमो झाल्यात तो अधूनमधून फोनवर बोलत होता इगतपुरीच्या शालेय मित्राच्या गेटटुगेदरच्या नियोजनात त्याही स्थितीत वहिनींसह त्याचा उत्साही सहभाग होता. गेटटुगेदरच्या दोन दिवस आधी त्याचा फोन आला, " हेमंत माझे आपल्या गेटटुगेदरला येणे डळमळीत झाले होते, कारण व्याही ऑस्ट्रेलियाहून नेमके त्याच दिवशी मला भेटण्यास नाशिकला येणार होते.. त्यांना सांगितलं मी एकदम ओक्के आहे. मीच त्यांना मुंबईला सकाळी जाऊन भेटून येणार आहे. मी गेट टुगेदरला नक्की येणार आणि हो बायकोलाही घेऊन येणार!!"
यावेळी गेटटुगेदरला आम्ही पंचवीस जोडपी होतो. सर्वांचे पुन्हा लग्न लावून त्या सोहळ्याचा तो मधुर क्षण आम्ही पुन्हा अनुभवणार होतो. मित्र शेरवानीत डोक्यावर टोपी फेटा चढवून तर बायका पैठणी नथ गजरा माळून तयार झाल्या होत्या. केमोथेरपीने दिनेशच्या डोकयावरचे केस पूर्णपणे गेले होते, गेटटुगेदरला गुजराथी दिनेशने डोक्यावर पुणेरी पगडी घालून आला होता, बायको बरोबर मित्राच्या साक्षीने मराठी मंगलाष्टकात पुन्हा त्यांचेही लग्न लावले.
रेन डान्स..स्विमिंग पुल मध्ये मस्ती करण्यात तो आनंद उधळत होता.सर्वाशी हास्य विनोद गप्पा यात सहभाग घेताना पाहून दिनेशला असा दुर्धर रोग झाला असेल असे कोणालाही सांगूनही खात्री पटली नसती. ते दोन दिवस मजेत गेले होते.
इगतपुरीच्या पावसाळ्यात निसर्गरम्य रेन फ़ॉरेस्ट या सात एकराच्या रिसॉर्ट मध्ये सर्व मित्र आपल्या सौभाग्यवतीसह वरून रिमझिम पावसाच्या सरीत वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पोझ मध्ये फोटो काढण्यात व्यस्त होते. यात दिनेश सर्वात अग्रेसर होता.
या सर्व आनंदी साठीच्या आजी आजोबा झालेल्या मित्रांच्या जोडप्याकडे पाहून माझ्याकडून संजय राठोड याच्या “गुलाबी साडी” या गीताची स्फूर्ती घेऊन या ओळी लिहिल्या गेल्यात.
पैठणी साडी नेसली
भरजरी तिचे काठ..
लग्नाचाच दिवस
आठवे आम्हा आज..
मोगऱ्याचा गजरा डोई
अन घातलाया साज..
दिसतेय लई भारी,
जणू अप्सराच खास..
पैठणी साडी आणि
लाली लाल-लाल..
राजा राणीची जोडी ,
फोटो आपला काढ..
अहोंना शोभे जाकीट
झब्बा जरीचा छान ..
मस्तकी डोई पगडी
घालू एकमेका हार..
डेट इथं तुझी माझी
डीजेवर करू नाच..
शाळेतले मित्र म्हणती
मज्जा करारे आज..
पैठणीसाडी आणि
लाली लाल-लाल..
राजा राणीची जोडी ,
फोटू आपला काढ..
काळ तो मागे फिरला,
तरुण, जरी वय साठ ..
मित्रांनी आपल्या घातला
लग्नाचा सुखद पुन्हा घाट..
रिसॉर्टला रूम बुक
मधुचंद्रासाठी खास ..
मधूर साऱ्या स्मृतीना
रात्रभर आठवू आज..
पैठणी साडी आणि
लाली लाल-लाल..
राजा राणीची जोडी ,
फोटू आपला काढ..
दोघे सुखी या जीवनी
नको काही ते आज..
देवाने दिले सर्वं काही
नाही आम्हाला माज..
सौं.आता आजी झाली ,
तरी देखणी दिसें फार ..
तिच्याच तालावर आजोबा,
नाचतो खूप खूप छान ..
पैठणी साडी आणि
लाली लाल-लाल..
राजा राणीची जोडी ,
फोटू आपला काढ..
दिनेश आणि सौं.वहिनी आनंदात होते इंगतपुरीच्या रेंन फ़ॉरेस्ट रिसॉर्ट मध्ये वेग वेगळ्या ठिकाणी दोघांचे फोटो काढण्यात मशगुल होता… आणि इतरांचेही फोटो व्हिडीओ दिनेश काढत हॊता..
कँसरशी लढण्यासाठी दहा दिवसापूर्वी तो मुंबईहून केमो करून आला होता यावर आमचा कोणाचाव विश्वास बसत नव्हता.
(क्रमश:)
हेमंत नाईक
सुरपाखरू#३०दिवसात ३०#प्रयोग २०२६