‘एक दिवस - मोबाईल शिवाय’
हॅलो… हॅलो…
समोरून येणारा आवाज बंद झाला आणि माझ्या मोबाइलचं स्क्रीन विचित्र वागायला लागलं. मी काहीच टच करत नव्हते तरी वेगवेगळे अॅप्स स्वतः उघडत होते मुख्य म्हणजे बॅंकेचे आणि यू पी आयचे. मला लगेच लक्षात आलं फोन हॅक झाला आहे!
माझा मुलगा आय टी क्षेत्रात असल्याने मी त्याला कॉल लावला, सांगितले असं होतंय आणि त्याने सांगितल्याप्रमाणे मी फोन लगेच बंद करून टाकला. मुलाने सायबर क्राइम ब्रांच ला कम्प्लेंट केली, सगळ्या बॅंक्सना कळवून टाकले पैसे काढण्याची संमती स्थगित करावी. माझे ई मेल अकाउंट्स, सोशल मीडिया - फेसबुक, व्हॉट्अॅप इत्यादी सगळ्यांचे पासवर्ड्स त्याने लगेच बदलून टाकले. आम्ही नवीनच फोन घ्यायचा ठरवलं सिम सुद्धा त्याच नंबरचं पण नवीन घ्यायचं ठरवलं. ह्या सगळ्याला एक दोन दिवस लागणार होते.
रात्री झोपताना मोबाईल चार्जिंग ला लावायची सवय. पण लक्षात आलं काही फायदा नाही. झोपताना काही शास्त्रीय संगीत ऐकावे म्हंटलं तर ते ही नाही. आता संगीत फोन वरच ऐकतो त्यामुळे बेडरूम मधे संगीत ऐकण्याची दुसरी काही व्यवस्था पण नाही. स्वतःच गुणगुणले आणि ठरवलंच सकाळी उठून आधी अनेक महिन्यांपासून बंद पडलेला रियाझ करायचा. सकाळी व्हॉट्अॅप च्या गुडमॉर्निंग मॅसेजेसच्या ऐवजी मी आपल्या तानपुऱ्याशी संवाद साधला. त्याचे लाड केले, त्याचे तार कसून हव्या त्या स्वरात लावले आणि त्याच्या स्वरात स्वर मिसळून मनसोक्त गायले. आत्म्याची इतकी तृप्ती खूप दिवसाने अनुभवली! आज आसपासची झाडं, पक्षी देखिल खूप आनंदात असल्याचा भास झाला कदाचित ते नेहमी आनंदातच असतील पण माझंच अर्ध लक्ष फोन मधे असायचं.
बागेत पाणी देताना एखादं सुंदर फूल आलेलं दिसलं, की लगेच फोन मधे त्याचा फोटो काढून सोशल मीडिया वर टाकणे आणि नैसर्गिक सौंदर्य लुटवणे ही माझी सवय आणि त्या दिवशी तर बाग जरा जास्तच बहरली होती पण मला एक ही फोटो काढता येईना मग काय! फुलांशीच गप्पा मारल्या, त्यांच्या वर हळुवार हात फिरवून त्यांचे लाड केले… आश्चर्य म्हणजे झाडांनी पण माना डोलावून मला प्रेमळ रिप्लाय दिला. फोटो काढण्यात ही स्पर्शाची देवाण घेवाण नाही हे लक्षात आलं आणि ठरवलं आता रोज ह्यांचे असे हातांचा स्पर्श देऊन लाड करायचे.
लगबगीने घरात आले आज बटाट्याचे पराठे बनवायचं ठरलं होतं. कालच्या फोनच्या गोंधळामुळे भाजीवाल्याकडे जाता आलं नव्हतं म्हंटलं ब्लिंकिट किंवा झेप्टो (फास्ट डिलिव्हरी देणारे अॅप्स) कडून मागवून घेते. 5 मिनटात तर भाजी घरी येईल. अरे देवा! हे अॅप्स तर फोन मधे बंद आहेत. झालं… तसंच धावत पळत भाजीवाल्या कडे गेले, कारण मुलाला बॅडमिंटन खेळून मग येताना भाजी आणायला उशीर झाला असता. भराभर भाजी घेतली आणि नेहमी प्रमाणे आता क्यूआर कोडने पैसे देईन म्हंटलं तर फोन नाहीना पर्स मधे! अन हल्ली सगळीकडे ऑनलाईन पेमेन्ट असल्याने पैसे जवळ नसतातच फारसे. मग भाजीवाल्याला परिस्थिती समजावण्यात 5 मिनिट गेले. घरी येवून पटापट स्वयंपाक उरकला. मुलगा ऑफिसला गेला आणि मी जरा शांत बसले, तितक्यात लक्षात आलं आज कि उद्या मैत्रिणीच्या पुस्तकाचं विमोचन आहे, तिने मला आग्रहाचं निमंत्रण दिलं होतं. जाणं अत्यंत आवश्यक होतं. म्हंटलं दिनांक, वेळ, जागा इ. तिलाच फोन करून विचारून घेते पण बोलणार कसं?.. आणि लक्षात आलं अचानक माझा सबंध जगाशी पूर्ण पणे तुटला आहे. प्रत्यक्ष जाऊन बोलल्या शिवाय मला कुणाशीच बोलता येणार नव्हतं. आणि एक भिती अचानक मनात घर करून गेली. काही इमर्जन्सी आली तर कुणाशी कसा संपर्क साधणार? घरच्यांना कसं कळवणार? पण मग मनाला धीर दिला आपले पूर्वज राहिलेच की बिना फोनचे. तसंच मी पण राहून घेईन. एकच तर दिवस काढायचा आहे उद्या येईलच की नवा फोन. आणि मग दिवस भर बऱ्याच दिवसांपासून राहिलेली घरकामं, आवर सावर, अर्धवट राहिलेले पेंटिंग हे सगळं करायला मला भरपूर वेळ मिळाला आणि मग ठरवलं आठवड्यातून एक दिवस असं फोन बंद करूनच ठेवायचा ह्याला डिजिटल फास्टिंग पण म्हणतात. शरीर, मन ताजेतवाने ठेवण्या साठी हे अत्यंत आवश्यक आहे. तर अश्या माझ्या ह्या मोबाईल शिवायच्या एका दिवसाने मला जगण्याची एक नवी दृष्टी दिली!
सई देशपांडे
03.01.2026
सुरपाखरू #30दिवसात30 #प्रयोग2026