नव्या आशा, नवी स्वप्ने

झाले गेले विसरूनी जावे, नवीन आशा नवीन स्वप्ने… घेऊनी चलू … नव्या सूर्यकिरणांसवे…

नवीन वर्षामधे पदार्पण करतांना, मागे वळून मागच्या वर्षात सहजच बघितल्या जाते. स्वतःच केलेल्या चुका चाचपडून बघितल्या जातात. नक्की आपलं काय चुकलंय..?बोलतांना, कृती करताना की.. नक्की कशामुळे. आपल्या अपेक्षा जास्त होत्या का..? की, कोणितरी आपल्याला गृहीत धरल्या मुळे तर आपणच आपल्या वर ह्या सगळ्यांचे ओझे आपणूनहून घेतले.

होऊ शकते समोरच्याचे अपेक्षांचे ओझे आपण जास्तच घेतले… नकळत पणे.

पण ठीक आहे. असे होऊ शकते.. चुकतंच माणूस, मी तर म्हणते चुकायला हवेचं. त्याशिवाय का… आपण सुधारतो…?

आणि हो, अहो नुसत्याच चुका किंवा वाईटच घडतं असेही नाही.. स्वतःच स्वतःला आधीच्या वर्षातल्या चांगल्या वाईट गोष्टींसाठी पडताळून पहावे… मग आठवतं,अरे..! या सगळ्या वाईट गोष्टींपेक्षा लाख मोलाच्या गोष्टी आपण केल्या की…

लहानपणापासून एक इच्छा होती..भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सशस्त्र क्रांतीचा पुरस्कार ज्यांनी केला, तसेच मराठी भाषेला अनेक नवीन शब्द ज्यांनी दिले आणि हिंदुत्वाचे तत्त्वज्ञान ज्यांनी मांडले, ज्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली फक्त आपल्या भारतमाते साठी.. त्यांना अभिवादन देण्यासाठी, एकदा तरी त्या अंदमाच्या तुरुंगाला भेट द्यावी… नतमस्तक व्हावं तीही पूर्ण झाली..

मनात वर्षानुवर्षे विठूमाऊलीच्या भेटीची आस होती, तीही दिंडीच्या साथसंगतीने जायची..झालीच की ती पूर्ण. अर्थात बोलवणारा दुसरा तिसरा कोणी नाही तोच सावळा पांडुरंग होता की…

इतकंच काय देवीच्या समोर नवरात्रात भक्तीगीतांची मैफिल व्हाव्ही आणि त्यात निवेदन करावं.. एक छोटंसं स्वप्न तेही पूर्ण केलं स्वप्न..जगदंबेनं..

कित्येक दूर गेलेली नाती.. परत जवळ आली. कधीतरी सहज रस्त्यात कोणीतरी भेटतं.. आणि म्हणतं

" तुम्ही दिलेल रोपट आता छान वाढलंय.. छान फुलं येतायेत हो.. खूप खूप धन्यवाद."

हाही आनंद काय कमी.. आपल्या सोबत चार जणांना आनंद नक्कीच देऊ शकतो आपण या छोटयाश्या रोपट्यातून.

त्या तुम्हीच ना.. ग्रुप वर मधून मधून लेख टाकत असता… आवडतं हं.. छान असतं साधं सोपं.. मनाला सहज भावणारं.. अशाच लिहीत रहा हो… अशी छानशी शाबासकीची थाप देणाराहि कधी कधी भेटतोच.. मग वाटतं जे मनात आहे ते उतरवावं… आपल्यासाठी आपल्या आनंदासाठी…

त्यात आमच्या “#सुरपाखरूची” सोबत आहेच… मग काय..! करूयात नवीन संकल्प.. लिहिण्याचा.. मनातले उतरवण्याचा…या सुरपाखरू सोबत.

दिपाली प्रशांत लाभे.

सुरपाखरू 2026

3 Likes