भोंडला एक लोकपरंपरा

सुरपाखरू
#30 दिवसात 30
#प्रयोग 2026

भोंडला एक लोकपरंपरा

गणपती गावी गेले की वेध लागतात नवरात्रीचे. नवरात्री मध्ये अनेक ठिकाणी भोंडला हा खेळ खेळला जातो.

आमच्या लहानपणी आम्ही मुली हा खेळ खेळत असायचो. माझं गाव आंध्र, कर्नाटक सीमेवर असल्याने आम्ही बदकम्मा खेळायचो.

भोंडला हा महाराष्ट्रात तर हादगा हा कोकणात आणि भुलाबाई ही विदर्भात खेळली जाते. मध्यप्रदेशात संजाबाई, आंध्रप्रदेश इथे बदकम्मा. असं म्हणतात की गुजराथ मधला गरबा हे भोंडल्याचे एक रूप आहे. नाव वेगवेगळी असली तरी या उत्सवाचे स्वरूप एकच.

भोंडला दहा दिवस ते सोळा दिवस, भुलाबाई एक महिना तर हादगा हा सोळा दिवस खेळला जातो. महत्वाचे म्हणजे यात कोणत्याही प्रकारचे विधी वगैरे नाहीत. पहिले सोळा दिवस खेळला जाणारा हा खेळ काळाच्या ओघात आता फक्त नवरात्रीच्या नऊ दिवसात खेळला जातो.

आपली भारतीय संस्कृती ही कृषी वर आधारित आहे. त्यामुळे आपले सण, वार हे कृषी जीवनाशी निगडित आहेत. आश्विन महिन्यात पाऊसमान कमी झालेले असते. याचवेळी सूर्य हा हस्त नक्षत्रात प्रवेश करत असतो. जाणारा पाऊस उदंड हस्ते देऊन भूमीला तृप्त करून परतत असतो.

भोंडला खेळताना हस्त नक्षत्राचे प्रतीक म्हणून पाटावर हत्ती रेखाटला जातो. त्याला सुरेख सजवले जाते व मुली त्याभोवती फेर धरून नाचतात.
हत्ती हा सुख समृद्धीचे प्रतीक. त्यामुळे हत्तीच्या पावलाने घरात सुखसमृद्धी नांदू दे!! असा विचार त्यामागे असावा असे वाटते.

पूर्वी लहान वयात लग्न व्हायची. स्त्रियांना घर ते दार एवढीच चौकट स्वतंत्र असायची. शेतीकाम करणाऱ्या स्त्रियां बाहेर पडल्या तरी फक्त कामासाठी असा रिवाज होता. त्यामुळे असे सण आले की स्त्रियांना थोडी मोकळीक मिळायची. मंगळागौर, नागपंचमी असे सण स्त्रियांना निसर्गाच्या जवळ नेणारे. झाडांशी मैत्री करायला लावणारे त्यामुळे स्त्रिया आतुरतेने या सणांची वाट पहायच्या.

भोंडला खेळताना जी गाणी म्हणली जायची त्यातून मनातील घुसमट दूर व्हायची. सांकेतिक भाषेत, गाण्यात स्त्रिया आपल्या मनातील दुःख दूर करायच्या. ही गाणी म्हणजे एक प्रकारचा stress relief होता. असे म्हणू शकतो.

असे म्हणतात की भोंडल्याची मूळ गाणी सोळा आहेत. पण आता प्रादेशिक सरमिसळ झाल्याने अनेक गाणी ही मूळ गाण्यात चपखलपणे जोडली गेली आहेत.

ह्या अश्या लोकपरंपरा, उत्सव आपल्या जगण्याचे मूळ आहेत. ते टिकवायला हवे. जपायला हवे.

©®माधवी देवळाणकर