शब्दांची जुळवाजुळव नव्हे, तर विचारांची 'धार' काढणारी प्रक्रिया म्हणजे - लिहिणे

‘सुरपाखरू’ प्रकल्पाची घोषणा झाली आणि एक प्रश्न विचारला गेला - “आपण हेच विचार ऑडिओ रेकॉर्डिंग किंवा व्हिडिओ करून मांडले तर चालणार नाही का? लिहायचा अट्टाहास कशासाठी?”

.

वरकरणी हा प्रश्न सोपा वाटतो. आजच्या रिल्स आणि व्हिडिओच्या जमान्यात तर तो रास्तही वाटू शकतो. पण, मंडळी, लिहिणं आणि बोलणं यात एक मूलभूत फरक आहे आणि तिथेच आपल्या या ३० दिवसांच्या प्रवासाचं गुपित दडलं आहे.

.

१. मेंदूला जागं करणारं आव्हान (The Goldilocks Rule)
.
जगप्रसिद्ध लेखक जेम्स क्लियर त्यांच्या ‘अ‍ॅटॉमिक हॅबिट्स’ या पुस्तकात ‘गोल्डीलॉक्स नियम’ (The Goldilocks Rule) मांडतात. ते म्हणतात, “मानवी मेंदूला जेव्हा एखादे काम अतिशय सोपे वाटते (उदा. फक्त बोलणे), तेव्हा त्याला कंटाळा येतो. जेव्हा काम अतिशय कठीण वाटते (उदा. एका दिवसात कादंबरी लिहिणे), तेव्हा मेंदू हार मानतो. पण, जेव्हा काम थोडेसे आव्हानात्मक असते, जे करण्यासाठी थोडा ‘जोर’ लावावा लागतो, तेव्हाच आपला मेंदू सर्वात जास्त कार्यक्षम (Peak Performance) होतो.”

.

रोज २५० शब्द लिहिणे हे अगदी त्या ‘गोल्डीलॉक्स झोन’ मध्ये येते. हे अशक्यही नाही आणि अगदीच सोपेही नाही. जेव्हा तुम्ही पेन कागदावर टेकवता किंवा कीबोर्डवर बोटे ठेवता, तेव्हा तुमच्या मेंदूला आळस झटकून कामाला लागावेच लागते. व्हिडिओमध्ये आपण भावनेच्या भरात अनेकदा विस्कळीत बोलून जातो, पण लेखनात तसे चालत नाही.

.

२. फ्रान्सिस बेकन आणि ‘अचूक’ माणूस
.
इंग्रजी तत्वज्ञ फ्रान्सिस बेकन यांचे एक प्रसिद्ध वाक्य आहे - “Reading maketh a full man; conference a ready man; and writing an exact man.” याचा अर्थ असा की, वाचनाने माणूस प्रगल्भ होतो, चर्चेने तो हजरजबाबी होतो, पण केवळ आणि केवळ लेखनामुळेच माणसात ‘अचूकता’ (Exactness) येते.

.

जेव्हा आपण लिहायला बसतो, तेव्हा विचारांचे विस्कळीत धागे आपल्याला एकसंध करावे लागतात. व्हिडिओमध्ये “ते… काय म्हणतात त्याला…” असे म्हणून वेळ मारून नेता येते, पण लेखनात तुम्हाला नेमका शब्द शोधावाच लागतो. ३० दिवस जेव्हा तुम्ही रोज २५० शब्दांचा हा व्यायाम करता, तेव्हा तुमच्या विचारांमधील गोंधळ कमी होऊन सुस्पष्टता (Clarity) येऊ लागते. वाक्यरचना जुळवताना, शब्दांची निवड करताना तुम्ही नकळत स्वतःच्याच विचारांना आकार देत असता.

.

३. स्वतःची नवी ओळख (Self Discovery)
.
लिहिणे म्हणजे स्वतःशीच केलेला संवाद आहे. अनेकदा जे विचार बोलताना ओठांवरून निसटून जातात, ते कागदावर उतरताना आपल्यालाच नव्याने उमजतात. ३० दिवसांच्या या सातत्यानंतर तुम्हाला आरशात तीच व्यक्ती दिसेल, पण तिची विचार करण्याची पद्धत बदललेली असेल. तुमचे विचार जास्त तर्कशुद्ध (Logical) आणि शिस्तबद्ध झालेले असतील.

.

प्रसिद्ध लेखक अर्नेस्ट हेमिंग्वे त्यांच्या साध्या पण प्रभावी वाक्यांसाठी ओळखले जायचे. ते म्हणायचे, “The only kind of writing is rewriting.” म्हणजे, मनातील विचार कागदावर उतरवून त्याला पुन्हा पुन्हा तासणे, यातच खरी मजा आहे.

.

म्हणूनच ‘सुरपाखरू’ मध्ये आपण फक्त ‘कंटेंट’ तयार करत नाही आहोत, तर स्वतःच्या विचारांची ‘बैठक’ पक्की करत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही दिसता, पण शब्दामध्ये तुम्ही ‘असता’.