मूळ प्रकाशन: #30 दिवसात 30# प्रयोग 2026 - सुरपाखरू साहित्य
संत जनाबाई
जनाबाई ईश्वराचा साक्षात्कार झाल्यावर काय विचार मांडते ते पाहू या..
' ज्योती भरली की जी आता नाही दुजा भाव॥
मन ठकासी ठकिले कृष्ण अक्षराने लिहीले॥
झाला सर्वांगाचा डोळा हरी नामाची ही लीला॥
मज एकांताशी नेले पुन्हा नाही हो आणिले॥
जनी नामयाची दासी पांडुरंग भीवरेषी॥
मी स्वतः ज्योतिर्मय झाले.विठ्ठल आणि मी तादात्म्य पावलो.दुजाभाव उरला नाही.मन ठकाने ठकवून ते श्रीकृष्णा शब्दाशी एकरुप झाले.त्या पांडुरंगाच्या लीलेने माझ्या सर्वांगाला दृष्टी फुटली त्याने मला एकांतात नेले आणि
पुन्हा नाही आणले.चंद्रभागेतीरी राहणारी नामयाची दासी जनी विठ्ठलात एकरुप झाली.सामावून गेली.तिचे वेगळे अस्तित्व राहिलं नाही .हे पंढरपूर भूमीचे महात्म्य आहे.
' टाळ मृदुंगाचा ध्वनी दिंड्या पताका घेऊनी॥
संत जाती पंढरीसी देव सामोरा ये त्यासी॥
देऊनिया अलिंगन त्याचा घेतो भाग शीण॥
सर्व तीर्थांचे माहेर जनी म्हणे पंढरपूर॥'
जन्म- मरणाचा धाक जिथे संपतो ते पंढरपूर जनीचे माहेर आहे.पुढे ती म्हणते,की नामदेवामुळे तिला ज्ञानदेवाचा सहवास घडला आणि ज्ञानदेव कृपेने योगविद्या प्राप्त झाली.परमार्थ वाटचालीमध्ये वाणी परेत जाऊन
लुप्त झाली आणि शरीर परब्रह्म होऊन त्यात मौनाची सनी वाजू लागली म्हणजेच स्वतःशीच संवाद सुरू झाला.कारण माझी विठू माउलीच
तिथे वास्तव्याला आली .म्हणजेच तिला साक्षात्कार झाला आणि अणूहून पण लहान झाल्यामुळे पांडुरंग तिला एखाद्या फुलाच्या पोकळ देहात सुद्धा भेटू शकतो असा प्रत्यय आला आणि मग ती जिथे ती पोचली तिथे कोट्यावधी सूर्याचे तेज प्राप्त झाले.जेव्हा विठ्ठलाची भेट झाली तेव्हा ती म्हणाली,
' जन्मोजन्मी देई हरी।दासी नाम्याची मी खरी।
भोळा माझा नामदेव।त्यांसी तुम्ही सांभाळावे।
हीच माझी विनवणी ।मस्तक ठेविले चरणी॥'
तिला विठ्ठल काय सांगतो हा अनुभव ती सांगते
' जनीचे बोलणे वाचे नित्य कोणी।
तयाचे अंगणी निष्ठतसे
जनीलिया पदा अखंडित गाये।
तयाचे मी पाये वंदी माथा।
जनीचे आवडे जयासी वचन।
तयांसी नारायण कृपा करी।
पांडुरंग म्हणे ज्ञानदेवा।
जसा वर द्यावा जनी साठी॥
विठ्ठलाचा आशीर्वाद मिळाला.तिला सर्वत्र हरी दिसू लागला.परंतु विठ्ठला बरोबरच्या भक्तीमय प्रेमसंबंधाचा सर्वदूर गाजावाजा झाला .विठ्ठलाचे पदक चोरण्याचा तिच्यावर आरोप झाला.तिला सुळावर द्यायचं ठरलं.इथेच तिच्या भक्तीचा कसं लागला .विठ्ठलानेच तिची पाठराखण केली सुळाचं पाणी झालं.मात्र त्यानंतर जनाबाईंने अन्याविरूद्ध संघर्षाची भूमिका घेतली.कनिष्ठ जातीत जन्म त्यातून स्त्री.
समाजाने या दोन्ही घटकांना परंपरेचा आड घेऊन अध्यात्माचा अधिकार नाकारला होता.पण जनाबाईने भक्ती काव्यातून या रुढी ग्रस्त समाजबंधनावर मात केली.तिने बंड पुकारले.ती म्हणाली,
” पंढरपूरची पेठ हरिनामाच्या व्यापाराने गजबजलेली आहे.या व्यापारी पेठेत मीही माझे
हरिनामाचे विक्रीचे पाल मांडले आहे.कुणी कितीही निंदा केली तरी त्याला मी जुमानणार नाही.लज्जा भिती हे सारे बाजूला टाकून मी नि:संग झाले आहे.तुझ्या माझ्या प्रेमापुढे मला आता जगाची पर्वा नाही!
स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारलेल्या काळात जनाबाई ने भक्तीमार्गाने
अध्यात्मिक उंची गाठणे हे वारकरी परंपरेचे
आपल्या सामाजिक व्यवस्थेला मोठे योगदान आहे !